जळगाव जिल्ह्यातील यावल ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयातील साहित्य खरेदी प्रकरणाने खळबळ उडाली आहे. तब्बल १७ कोटी ७२ लाख रुपयांच्या खरेदीत अनियमितता झाल्याच्या आरोपावरून तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांसह सात जणांविरुद्ध यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी १९ नोव्हेंबर २०२६ रोजी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०५/२०२६ नोंदविण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे तत्कालीन प्रभारी प्रशासकीय अधिकारी डॉ. मनोज मंगल पाटील (वय ४९, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपींमध्ये तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव शिवाजीराव चव्हाण, डॉ. यु. पी. तारसाळकर, लेखा अधीक्षक हरीश्चंद्र आर. वाघी, प्रशासकीय अधिकारी मिलिंद निवृत्ती काडी, डॉ. बाबुलाल भग करेला, सहाय्यक अधीक्षक मुकुंद खाडू घोडे आणि मे. जी. टी. एन्टरप्रायजेस या संस्थेच्या प्रतिनिधीचा समावेश आहे.

फिर्यादीनुसार, ६ ऑक्टोबर २०२० ते २५ मे २०२२ या कालावधीत यावल ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय जळगावसाठी दैनंदिन वापराच्या साहित्याची खरेदी करताना शासनाचे खरेदी नियम आणि ई-निविदा प्रक्रियेचे पालन करण्यात आले नसल्याचा आरोप आहे.

तसेच आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक मान्यता न घेता विशिष्ट संस्थेला लाभ मिळवून देण्यात आल्याचा आणि शासनाच्या आर्थिक हिताला बाधा पोहोचवून १७ कोटी ७२ लाख ६७ हजार ९६४ रुपयांच्या खरेदीत अनियमितता केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ४०९, ४२० आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ त्र्यंबक धारबळे यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपविण्यात आला आहे.

या गुन्ह्यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली असून, पुढील तपासात काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *