जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्याच्या ग्रामीण भागातील आदिवासी युवतीने राज्यस्तरावर आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवला आहे. ब्लॉग लेखन स्पर्धेत लिना संजीव सपकाळे हिने तृतीय क्रमांक पटकावत ७० हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले. तिच्या या यशामुळे यावलसह संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.

गडचिरोली येथे १५ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित राज्यस्तरीय जनजातीय गौरव दिन महोत्सवात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत येणाऱ्या कोसगाव, ता. यावल येथील लिना संजीव सपकाळे हिने ब्लॉग लेखन स्पर्धेत राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल तिला ७० हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. विशेष म्हणजे, पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते तिला हा पुरस्कार देण्यात आला.

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी संस्कृती, लोककला, रूढी-परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास विभागामार्फत गडचिरोली येथे राज्यस्तरीय जनजातीय गौरव दिन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात विविध सांस्कृतिक आणि सर्जनशील स्पर्धा घेण्यात आल्या. महाराष्ट्रातील विविध एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांमधील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

ब्लॉग लेखन स्पर्धेत राज्यभरातील एकूण ५० स्पर्धक सहभागी झाले होते. राज्यस्तरीय गुणांकन समितीने निर्धारित निकषांनुसार सहभागी स्पर्धकांच्या लेखनाचे मूल्यमापन केले. यामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासह दोन प्रोत्साहनपर पारितोषिकांची निवड करण्यात आली. यावल प्रकल्पातील लिना सपकाळे हिने उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक मिळवला.

या महोत्सळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, पद्मश्री चैत्राम पवार, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त निकेश सागर (भा.प्र.से.), तसेच केंद्रीय जनजातीय कार्यमंत्री जुएल ओराम यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

ग्रामीण आणि आदिवासी भागातील युवक-युवतींमध्ये विविध कलागुण, सर्जनशीलता आणि लेखनकौशल्य दडलेले असते. योग्य व्यासपीठ, संधी आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते राज्य व राष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करू शकतात, हे लिना सपकाळे हिने आपल्या यशातून सिद्ध केले आहे. तिचे हे यश यावल प्रकल्प क्षेत्रासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील नवोदित युवक-युवतींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

लिना सपकाळे हिच्या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *