AHILYANAGAR | अहमदनगर न्यायालयाने धनादेश अनादरीत प्रकरणात दिलेल्या एका निकालाची चर्चा सुरू आहे. आरोपीला दोषी ठरवतानाच न्यायालयाने फिर्यादी संस्थेची थकीत रक्कम देण्याचे आदेश दिले, तर आरोपीला रक्कम भरण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे.

अहमदनगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक २ च्या माधुरी रा. खनवे यांनी धनादेश अनादरीत प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निकालात फिर्यादी संस्थेला न्याय मिळण्यासोबतच आरोपीला आर्थिक दिलासा मिळाल्याचे समोर आले आहे.

मंगलदिप मल्टीस्टेट अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुख्य शाखा अहमदनगर यांनी रोजिया अय्याज सय्यद, रा. नालेगाव, अहमदनगर यांच्याविरुद्ध परक्राम्य संलेख अधिनियम कलम १३८ अंतर्गत ४२ हजार ९०० रुपयांचा धनादेश अनादरीत झाल्याप्रकरणी सं. फौ. ख. क्र. १०२१०/२०२४ दाखल केला होता.

सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि साक्षीपुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. मात्र, शिक्षा सुनावताना न्यायालयाने आरोपीला केवळ मूळ धनादेशाची ४२ हजार ९०० रुपयांची रक्कम भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले. तसेच ही रक्कम भरण्यासाठी एक महिन्याची मुदतही दिली.

या खटल्यात आरोपीच्या वतीने ॲड. शेख मिरताज गुलामदस्तगीर यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांनी साक्षीदारांची सखोल उलटतपासणी करून महत्त्वाचे मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांच्या युक्तिवादामुळे आरोपीवर अतिरिक्त आर्थिक दंड न लादता मूळ रक्कम भरण्याची सवलत मिळाली.

तर फिर्यादी संस्थेच्या वतीने ॲड. ए. व्ही. राशिनकर यांनी काम पाहिले. या निकालामुळे कायद्याच्या चौकटीत दोन्ही पक्षांना दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.


#Ahilyanagar #Ahmednagar #CourtVerdict #ChequeBounceCase #LegalNews #Judgment #Advocate #MaharashtraNews #NTVNewsMarathi #अहिल्यानगर #न्यायालय #चेकबाऊन्स #कायदेशीरबातमी #मराठीबातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *