अहिल्यानगरच्या शेवगावात बेकायदेशीर मावा निर्मिती अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला. या कारवाईत १८ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
शेवगावच्या कोरडे वस्ती परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीर मावा निर्मिती सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शुक्रवारी २८ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून दोन इलेक्ट्रिक मावा मशीन, ८० किलो तयार मावा, सुगंधित तंबाखू, ८०० किलो सुपारी चुरा, कलर, दोन वजनकाटे आणि दोन कार असा १८ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
कारवाईदरम्यान वसीम सत्तार तांबोळी, वय ३८ आणि शाहरूख उर्फ जावेद सलीम शेख, वय २७ यांना ताब्यात घेण्यात आले. हे दोघे आसिफ रहेमान तांबोळी याच्या सांगण्यावरून मावा तयार करीत असल्याची पोलिसांची माहिती आहे. आसिफ तांबोळी फरार आहे.
या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
