जळगाव जिल्ह्यात गिरणा धरण १०० टक्के भरलेले असतानाही एरंडोल तालुक्यासह परिसरात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गिरणा धरणातून तातडीने तीन आवर्तने सोडावीत, या मागणीसाठी सर्वपक्षीय पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले असून, मागणी मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ठेचा-भाकरी’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

१४ ऑक्टोबर २०२६ रोजी महाविकास आघाडी व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एरंडोलचे तहसीलदार गोपाळ पाटील यांना निवेदन दिले. गिरणा धरणातून पाणी सोडल्यास भूजल पातळी वाढण्यास मदत होऊन सुमारे एक ते दीड लाख शेतकरी, नागरिक आणि पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो, असे निवेदनात म्हटले आहे.

तहसीलदारांनी गिरणा पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता, जळगाव यांच्याशी संवाद साधून शेतकऱ्यांसोबत संयुक्त बैठक आयोजित करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

निवेदन देतेवेळी उबाठा शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ, काँग्रेस ओबीसी विभागाचे राज्य उपाध्यक्ष विजय महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पिता रमेश पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनील गोविंदा पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर महाले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उमेश पाटील, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील, मनसे तालुकाध्यक्ष विशाल सोनार, काँग्रेस शहराध्यक्ष संजय भदाणे, जिल्हा सचिव ॲड. हिम्मतराव पाटील, अब्दुल हक देशमुख, माजी तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र देसले यांच्यासह मदन भावसार, एन. डी. काळकर, रमेश जमादार, नंदू मराठे आणि इतर लोकप्रतिनिधी, संघटनांचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा न काढल्यास जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ठेचा-भाकरी’ आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *