जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील चुंचाळे येथे श्री समर्थ सुकनाथ बाबा यांच्या मूर्ती स्थापनेचा वर्धापनदिन सोहळा शनिवारी, २१ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावल तालुक्यातील चुंचाळे येथील श्री वासुदेव बाबा दरबारात श्री समर्थ सुकनाथ बाबा यांच्या मूर्ती स्थापनेचा वर्धापनदिन सोहळा शनिवारी साजरा होणार आहे.

सन २००० मध्ये श्री समर्थ वासुदेव बाबा यांनी त्यांचे आजगुरू श्री समर्थ सुकनाथ बाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती. ही मूर्ती २१ किलो पंचधातूची असून, कर्नाटकातील उमदी येथील ९८ वर्षीय मूर्तिकाराने तयार केली होती. तेव्हापासून शिष्य आणि ग्रामस्थांनी ही परंपरा कायम ठेवली आहे.

सोहळ्याची सुरुवात सकाळी ६ वाजता मारुती अभिषेकाने होईल. साडेसहा वाजता सुकनाथ बाबा, रघुनाथ बाबा, वासुदेव बाबा आणि समाधीवाले बाबा यांच्या मूर्तींना स्नान व अभिषेक, तर साडेसात वाजता आरती होईल. सकाळी साडेआठपासून भजन-भारुड, दुपारी १२ वाजता महाआरती आणि १ वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. शिष्यगणांच्या आगमनापर्यंत महाप्रसाद सुरू राहणार आहे.

श्री सुकनाथ बाबांनी चुंचाळे येथे सलग १२ वर्षे तपश्चर्या केली. काशी येथून भ्रमण करत ते येथे आले होते. पशुपक्ष्यांची बोली त्यांना अवगत होती आणि ते पशुपक्ष्यांना दररोज धान्य खाऊ घालत असत. त्यांनी सुमारे ११५ वर्षांपूर्वी बालकांच्या शिक्षणासाठी शाळा सुरू करून शिक्षणाची गोडी निर्माण केली.

सुकनाथ बाबा यांना चुंचाळे येथे पुत्ररत्न प्राप्त झाले. ते म्हणजे श्री रघुनाथ बाबा. त्यांनी नाथ संप्रदायाच्या प्रचारासाठी भगवा झेंडा हाती घेतला. त्यांच्यासोबत श्री वासुदेव बाबा यांनीही आध्यात्मिक कार्य सुरू केले. श्री सुकनाथ बाबा आणि रघुनाथ बाबा यांनी वर्डी, ता. चोपडा येथे समाधी घेतली.

गुरूंच्या आदेशानुसार श्री वासुदेव बाबा यांनी गावात मंदिर, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सुकनाथ बाबा वनवासी वसतिगृहाचे बांधकाम केले. या सोहळ्याचा तसेच दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री समर्थ वासुदेव बाबा भक्तगण आणि ग्रामस्थांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *