जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेल्या नायगावमध्ये बँक शाखा नसल्याने ग्रामस्थांसह शेतकरी आणि विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. गेल्या १२ ते १५ वर्षांपासून सुरू असलेल्या या समस्येकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
काही वर्षांपूर्वी नायगाव येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा कार्यरत होती. मात्र, काही कारणास्तव ही शाखा बंद करून किनगाव शाखेला वर्ग करण्यात आली. सध्या नायगावमध्ये एकही राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने ग्रामस्थांना बँकिंग कामांसाठी किनगाव येथे जावे लागत आहे.
संजय निराधार योजनेतील लाभार्थ्यांना तसेच लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आणि पीएम किसान योजनेचे अनुदान घेणाऱ्या शेतकऱ्यांना बँकेच्या कामासाठी सुमारे तीन किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्यातही वृद्ध महिला व इतर लाभार्थ्यांना पायी किंवा मिळेल त्या वाहनाने प्रवास करत हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
नायगावची लोकसंख्या जवळपास दहा हजार असून ग्रामपंचायतीचे १३ सदस्य आहेत. मात्र, गावात बँक शाखा नसल्याने लोकप्रतिनिधींविषयी ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दुसरीकडे, नायगावच्या तुलनेत लहान असलेल्या सावखेडा सीम येथे स्टेट बँकेची शाखा कार्यरत असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले आहे.
सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीची चर्चा सुरू असून २१ जागांपैकी महाविकास आघाडीच्या १२ जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर उर्वरित ९ जागांसाठी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पक्ष कोणताही असो, उमेदवारांनी नायगावचा बँकेचा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
जिल्हा बँक प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन नायगाव येथे पूर्ववत बँक शाखा सुरू करावी, अशी मागणी दिव्यांग आघाडीचे जिल्हा पूर्व अध्यक्ष अरुण पाटील यांनी केली आहे.
