तडवी भिलोरी भाषेला राष्ट्रीय स्तरावर साहित्यिक गौरव मिळवून देणारी अभिमानास्पद कामगिरी जळगाव जिल्ह्यातून समोर आली आहे. कोरपावली येथील युवा कवी अलताफ तडवी यांना प्रतिष्ठित साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, त्यांच्या पहिल्या ‘जतरा’ काव्यसंग्रहाचे रांची येथे प्रकाशन करण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील कोरपावली येथील युवा कवी आणि साहित्यिक अलताफ सलीम तडवी यांनी तडवी भिलोरी भाषेतील साहित्यिक योगदानाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर मानाचा ठसा उमटवला आहे.
त्यांच्या साहित्यिक कार्याची दखल घेत त्यांना प्रतिष्ठित पाचव्या ‘जयपाल-ज्युलियस-हन्ना साहित्य पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. याच सोहळ्यात त्यांच्या ‘जतरा’ या पहिल्या कविता संग्रहाचे झारखंडची राजधानी रांची येथे प्रकाशन करण्यात आले.
पुरस्कार आणि काव्यसंग्रह प्रकाशन अशा दुहेरी यशामुळे तडवी भिलोरी भाषा, तडवी भिल्ल समाजाची सांस्कृतिक अस्मिता आणि कोरपावली गावाचा गौरव राष्ट्रीय स्तरावर उंचावला आहे.
