मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय आणि ज्येष्ठ नागरिक संघ, गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य गौरव पुरस्कार २०२६ मध्ये ज्येष्ठ पत्रकार व पत्रलेखक विजय उर्फ बाळ पंडित यांच्या मालवणी कथेला द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. त्यांच्या साहित्यिक योगदानाचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय आणि ज्येष्ठ नागरिक संघ, गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गोरेगाव विभागातील ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह वाढवण्यासाठी साहित्य गौरव पुरस्कार २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी कथा, प्रवासवर्णन, वैचारिक लेख, कविता तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विषयातील साहित्य मागवण्यात आले होते.
कथा स्पर्धेत ज्येष्ठ पत्रलेखक आणि पत्रकार विजय उर्फ बाळ पंडित यांच्या ‘पिंडाक कावळो… शिवलो… रे… शिवलो’ या मालवणी कथेला द्वितीय पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. प्रसिद्ध मालिका लेखिका आणि कवयित्री रोहिणी निनावे यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कथा विभागात प्रथम क्रमांक अंबल्ला जनार्दन आणि सीमा गंगाधरे यांना विभागून देण्यात आला, तर द्वितीय पारितोषिक बाळ पंडित यांना मिळाले.
कविता विभागात अनिल खेडेकर यांनी प्रथम, तर अरुणा रसे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. वैचारिक विभागात अशोक सामंत आणि प्रशांत मठकर यांना विभागून प्रथम क्रमांक देण्यात आला, तर आशा भोगटे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.
प्रवासवर्णन विभागात शितल केळकर यांनी प्रथम, तर मिनाक्षी कांबळे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. विज्ञान व तंत्रज्ञान विभागात प्रशांत पारकर आणि स्वाती माने यांना विभागून प्रथम क्रमांक, तर रेवती अयंगार यांना द्वितीय क्रमांक जाहीर झाला.
स्पर्धेचे परीक्षण रविराज गंधे, समता गंधे, रवींद्र माहीमकर आणि सुरेंद्र केळकर यांनी केले. विजेत्या स्पर्धकांसह वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी रोहिणी निनावे यांची मुलाखत रविराज गंधे यांनी घेतली. या मुलाखतीमुळे कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महेश अभ्यंकर यांनी केले. गोरेगाव पूर्व आणि पश्चिम विभागातील असंख्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. गोरेगाव ज्येष्ठ साहित्य गौरव पुरस्कार २०२६ चे पदाधिकारी यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
