AMRAVAT I अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात अवैध रेती उत्खननाविरोधात महसूल आणि पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. चिंचोली रेती घाटात संयुक्त पथकाने छापा टाकत ४० ब्रास रेतीसह उत्खननासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले. या कारवाईमुळे रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील मौजा चिंचोली येथील रेती घाटात महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई करीत अवैध रेती उत्खननाला चाप लावला. मंगळवार, दिनांक २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता तहसीलदार अभय धोरपडे यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान अवैध रेती उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारे लोखंडी पावडे, लोखंडी चाळण आणि अंदाजे ५०० मीटर लांबीचा दोर जप्त करण्यात आला. याशिवाय अंदाजे ४० ब्रास रेतीसाठादेखील जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय आग्राम, पोलीस हवालदार जीवन लांडगे, ग्राम महसूल अधिकारी सागर भांडवले आणि चेतन चुकले उपस्थित होते.
महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईमुळे अवैध रेती व्यवसायाला मोठा दणका बसला असून, परिसरात या कारवाईचे स्वागत होत आहे. अवैध रेती उत्खननाविरोधात अशाच कारवाया सातत्याने सुरू ठेवण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
जावेद खान | एनटीव्ही न्यूज मराठी | धामणगाव रेल्वे
#Amravati #DhamangaonRailway #Chincholi #SandMining #IllegalSandMining #RevenueDepartment #PoliceAction #BreakingNews #NTVNewsMarathi #अमरावती #धामणगावरेल्वे #चिंचोली #रेतीतस्करी #महसूलविभाग #पोलीसकारवाई #मराठीबातम्या
