AKOLA | देव दिवाळीनिमित्त अकोला शहरातील तब्बल ७२ मंदिरांमध्ये हजारो दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. मोठ्या राम मंदिरात ५ हजार दिव्यांच्या प्रकाशात विशेष पूजा आणि आरती पार पडली. यावेळी गुरुनानक जयंती, पौर्णिमा आणि देव दिवाळीचा त्रिवेणी संगम साधत धार्मिक उत्सवाला उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
त्रिपुरा राक्षसाचा नाश करून भगवान शंकराने असुरशक्तींचा नायनाट केला. आज समाजामध्ये असलेल्या अनिष्ट रूढींपासून सावध राहण्याची गरज असून, सनातन धर्मातील परंपरांना वैज्ञानिक आधार असल्याचे प्रतिपादन महापौर शारदाताई खेडकर यांनी केले. प्राचीन हिंदू धर्म हा पशुपक्ष्यांपासून मानवतेच्या प्रत्येक घटकाचा विचार करणारा, समाजातील सर्व घटकांना दिशा देणारा आणि राष्ट्रनिर्माणासोबत समाजाला मार्गदर्शक ठरणारा असल्याचे त्या म्हणाल्या. गुरुनानक जयंती, पौर्णिमा आणि देव दिवाळीचा तिहेरी संगम आनंददायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
संत गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने स्वर्गीय बच्चुलाल अग्रवाल यांनी स्थापित केलेल्या १२५ वर्षे जुन्या मोठ्या राम मंदिरात देव दिवाळीनिमित्त विशेष पूजा-अर्चना करताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नगरसेविका सुनीतादेवी अग्रवाल होत्या. यावेळी रंजीत खेडकर, माधव मानकर, संस्थेच्या अध्यक्ष सुमनदेवी अग्रवाल, विनायक सांडील्य गुरुजी, मनीषा विजय अग्रवाल, शितल गोपाल अग्रवाल, गिरीराज तिवारी, गिरीश जोशी, अनिल मानधने, सोनल शहा, गोपाल अग्रवाल, घनश्याम सावजी, देवकिसन खडसे, मीना नागलकर, उर्मिला दळवी, सुलोचना खोडे, अजय गुल्हाने, हेमंत शर्मा, प्रशांत शहा, सतीश शहा आणि नितीन ढोले आदी उपस्थित होते.
पाच पिढ्यांपासून सातत्याने सेवा करणे, भक्ती, श्रद्धा, विश्वास, मानवतेचे कार्य आणि संस्कृतीचे जतन करणे हे कठीण कार्य असून, सनातन धर्म सर्वांना सोबत घेणारा आणि मातृशक्तीचा सन्मान करणारा असल्याचे नगरसेविका सुनीता अग्रवाल यांनी सांगितले.
राम मंदिर परिसरात ५ हजार दिवे लावण्यात आले. शालिनी टॉकीजच्या मागील हनुमान मंदिर, रिझल्ट रामेश्वर शिव मंदिर आणि राम मंदिर हनुमान मंदिर येथेही दीपप्रज्वलन करण्यात आले.
सिद्धहस्त रांगोळी कलाकार प्रवीण पवार यांनी आकर्षक रांगोळी साकारली. श्रीराम हरिहर संस्थेच्या हरिहर मंदिर, हरिहर पेठ येथेही रांगोळी आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. विशेष आरती आणि पूजा-अर्चना करून देव दिवाळी, गुरुनानक जयंती आणि त्रिपुरा पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
#Akola #DevDiwali #TripuraPurnima #GuruNanakJayanti #RamMandir #Deepotsav #AkolaNews #MaharashtraNews #NTVNewsMarathi #अकोला #देवदिवाळी #दीपोत्सव #राममंदिर #गुरुनानकजयंती #मराठीबातम्या
