आज पातूर तहसील कार्यालयात आढावा बैठक; टँकर, विहीर अधिग्रहणासह पर्यायी जलस्रोतांवर होणार चर्चा

पातूर :खरीप हंगामातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी उद्धवसेनेचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख सरसावले आहेत. पातूर तालुक्यातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी (२६ नोव्हेंबर) तहसील कार्यालयात प्रशासकीय यंत्रणेची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे.

खरीप हंगामात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पातूर तालुक्यात पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन आणि पाणीपुरवठ्याच्या पर्यायी उपाययोजना आतापासूनच निश्चित करणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने आमदार नितीन देशमुख यांनी तहसीलदारांसह संबंधित प्रशासकीय यंत्रणेला सविस्तर माहिती व अहवालासह बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. गुरुवारी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, पातूर येथे ही बैठक होणार आहे. यामध्ये तालुक्यातील धरणे, तलाव आणि नद्यांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती, त्यांची कार्यक्षमता, उपलब्ध पाणी आणि भविष्यातील संभाव्य गरज याबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे.

विविध उपाययोजना प्रस्तावित

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, अत्यावश्यक परिस्थितीत खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे आणि पर्यायी जलस्रोतांचा वापर करण्याबाबतही बैठकीत नियोजन केले जाणार आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने आणि प्रभावीपणे वापर करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने आतापासूनच सज्ज राहावे, हा या बैठकीमागील प्रमुख उद्देश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *