उस्मानाबाद : उमरगा, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि वाड्मय मंडळाच्या उद्घाटनानिमित्त ‘गझल- ए- वतन‘ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.एच. जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.व्ही. एस.इंगळे होते.
याप्रसंगी उद्घाटनपर मनोगतात प्रा. डॉ.जी.एच.जाधव यांनी देशातील राजकीय घडामोडींवर भाष्य करणारी आपली रचना सादर केली.आपली रचना सादर करताना प्राचार्य जाधव म्हणाले की,
“राज्यात बंडाळी आली
कारभाराचा इस्कोट झाला.
मनाला वाटू लागले
कुठेतरी चालीसा म्हणावे..
मग हनुमानजी म्हणाले,
एकदम कसं ओक्के मध्ये हाय.”
गझल-ए-वतन या मैफिलीची सुरुवातीस गझलकार सय्यद पाशा रहेबर यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे महत्त्व अधोरेखित करणारी,
“है आसमॉं मे गुंजता ये हिंद का नारा
उंचा रहेगा जग में तिरंगा ये हमारा!”
ही गझल सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
याच विषयाचा धागा पकडत कवयित्री सौ. रेखा सूर्यवंशी यांनी,
“तुम्ही करा किती हो दंगा
राहील फडकत ध्वज तिरंगा”
ही देशभक्तीपर कविता सादर केली.
तर कवी करीम शेख यांनी आपली रचना सादर करताना सामाजिक समस्येवर आधारित,
“काय काय अनर्थ घडतो
या लग्नाच्या बाजारात.
लाख मोलाचा जीव तोलला जातो-
शंभर-हजाराच्या भावात.”
ही आपली रचना सादर केली.
समाजाच्या वास्तवावर आधारित गझल सादर करतांना कवी सुधीर कांबळे म्हणाले-
“जीवनाचे हेच माझ्या सार आता
लेकरू आईस होते भार आता”
त्यांच्या या गझलेने तरुणाईच्या काळजाला स्पर्श केला.
तर अॅड. शुभदा पोतदार यांनी स्त्रीवादाचा दृष्टिकोन मांडताना आपली रचना सादर केली. त्या म्हणाल्या-
“परिवर्तन फक्त घोषणातच राहते
पण कधीच झाले नाही परिवर्तन..
स्त्रीकडे माणूस म्हणून पाहण्याचे..”
तर गझलकार डॉ.विनोद देवरकर यांनी बदललेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारी गझल सादर केली. ते मतल्यात म्हणतात-
“सोडवी जो प्रश्न आमुचे एक ऐसा पक्ष नाही
ध्येय आहे फक्त सत्ता; हाय! दुसरे लक्ष नाही”
तर महाराष्ट्राची यशोगाथा अधोरेखित करताना कवी डॉ. चंद्रकांत पवार यांनी
“कौतुके अचंबित झाले अवघे देशराष्ट्र
हाती घेत विजय पताका सामर्थ्याने आज इथे उभा केवळ एक तो माझा महाराष्ट्र”
ही रचना सादर करून उपस्थितांचा प्रतिसाद मिळवला.
तर कवी डॉ. पद्माकर पिटले यांनी तरुणाई मध्ये जल्लोष निर्माण करणारी ‘कोकणातले काका’ ही प्रेम कविता सादर केली. कवी अमर देशटवार, कवी महादेव गुरव, कवी विश्वनाथ महाजन यांनी गेय कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
गझल-ए-वतन या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.व्ही.एस. इंगळे यांनी केला. या काव्यमैफिलीची सांगता कवी महाजन यांनी पसायदानाने केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. डी. व्ही. थोरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुभाष इंगळे यांनी तर डॉ. डी.बी. ढोबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सचिन बिद्री