सचिन बिद्री:उमरगा
उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील कसगी येथील चंदन उत्पादक शेतकऱ्यांनी चंदन तस्करांचा चांगलाच धसका घेतला आहे. दि १२ ऑक्टोबरच्या रात्री चंदन तस्करांनी येथील शेतकरी मनोहर मांडके व विठ्ठल जाधव यांच्या कसगी येथील शिवारातील १५ ते २० चंदनाची झाडे तोडून,चंदन चोरुन, प्रचंड नासधुस केली. तसेच तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारी व इतर साहित्य चोरणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर ॲड.शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात चंदन तस्करांचा व चोरट्यांचा बंदोबस्त करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तत्परतेने आखाव्यात अशी मागणी करण्यात आली आसून सदर बाबत दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.या निवेदनाची प्रत पोलिस स्टेशन व वन विभागालाही देण्यात आले आहे. निवेदनावर श्रीनिवास मुगळीकर, फाउंडेशनचे अध्यक्ष सत्यनारायण जाधव, उपाध्यक्ष राजू उर्फ व्यंकट भालेराव, सहसचिव करीमभाई शेख, सल्लागार ॲड. ख्वाजा शेख, खजिनदार धानय्या स्वामी, प्रदिप चौधरी, दादा माने, बबिता मदने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.