पतसंस्थेच्या उमेदवारांची धाकधूक वाढली…
गोंदिया : आज दि. ३० ऑक्टोबर २०२२ रोजी होणाऱ्या गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था,गोंदिया च्या निवडणुकीत हक्काचे संविधानिक प्रतिनिधीत्व प्रस्थापित संघटनांनी डावलल्यामुळे अनु.जमातीच्या शिक्षकांनी घेतलेल्या बहिष्काराच्या पवित्र्यामुळे व बदललेल्या समीकरणामुळे प्रस्थापित पॅनलच्या उमेदवारांची प्रचंड धाकधूक वाढली आहे.
गोंदिया जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून महाराष्ट्रात प्रसिध्द आहे.तसेच गोंदिया जिल्ह्यात अनु.जमातीच्या शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.जिल्ह्यातील जि.प.शिक्षकांचे अर्थकारण सांभाळणारी गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी,पतसंस्था आहे.पण बहुसंख्येने अनु.जमातीचे शिक्षक असणाऱ्या जिल्ह्यात पतसंस्थेतील हक्काच्या संविधानिक हक्कासाठी पतसंस्थेच्या स्थापनेपासून म्हणजेच सन-१९५८ पासून सतत दुर्लक्षित करण्यात आलेलं आहे.पण यावर्षीच्या पतसंस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रतिनिधीत्व मिळविण्याचा निर्धार अनु.जमातीच्या शिक्षकांनी केला.तरीसुद्धा प्रस्थापित पॅनलनी उमेदवारी न दिल्याने निवडणुकीवर बहिष्कार टाकला.
अनु.जमातीच्या शिक्षकांनी घेतलेल्या बहिष्काराच्या भूमिकेमुळे प्रस्थापित पॅनलच्या उमेदवारांच्या जय-पराजयाची समीकरणे बदलली आहेत.त्यामुळे उमेदवारांमध्ये निवडणुकीच्या निकालाबाबत प्रचंड धाकधूक वाढली आहे.अनु.जमातीच्या शिक्षकांनी बहिष्कार मागे घ्यावा,म्हणून प्रस्थापित पॅनलच्या शीर्षस्थ पुढाऱ्यांनी व उमेदवारांनी दबाव,अपप्रचार,भूलथापा व आमिषे अशा विविध निवडणूक तंत्रांचा वापर केला.पण अनु.जमातीच्या शिक्षकांची निवडणुकीसंदर्भात बहिष्काराची भूमिका ठाम आहे.त्यामुळे बहिकाराचा दणका कोणत्या पॅनलला बसेल,हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.