पुणे : शिरूर तालुक्यातील कोंढापुरी व कासारी येथील जमिनधारकांनी ७/१२ उता-यावरील पोटखराब वर्ग ( अ ) क्षेत्र लागवडीखाली आणले आहे अगर कसे याबाबत स्थळपाहणी चौकशी करण्याकरिता ५/१२/२०२२ रोजी सकाळी १० वाजल्यापासून चावडी ( तलाठी कार्यालय ) / ग्रामपंचायत कार्यालयात शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे . कोंढापुरी गावचे गावकामगार तलाठी दशरथराव रोडे यांनी ही माहिती दिली. याबाबत माहिती देताना गावकामगार तलाठी दशरथराव रोडे यांनी सांगितले की ,राज्यातील अधिकार अभिलेखामधील पोटखराब क्षेत्र ब-याच शेतक-यांनी सुधारणा करून लागवडीयोग्य आणलेले आहे.सदर सुधारणा केलेल्या लागवडीयोग्य क्षेत्राच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये न घेतल्यामुळे शेतक-यांना विविध लाभ मिळत नव्हते. जमिनधारकाने वर्ग ( अ ) खाली येणारी जमीन लागवडीखाली आणली तरी त्यावर कोणतीही आकारणी करता येत नव्हती. आता शासनाकडील २९/८/२०१८ रोजीचे अधिसुचनेद्वारे महाराष्ट्र जमीन महसूल ( जमिनीच्या वापरावर निर्बंध ) नियम १९६८ च्या नियम २ चा पोटनियम ( २ ) ऐवजी पुढील पोटनियम दाखल करण्यात आलेला आहे.( २ ) वर्ग ( अ ) खाली येणारी जमीन धारकास कोणत्याही वेळी लागवडीखाली आणता येईल आणि अशाप्रकारे धारकाने जमीन लागवडीखाली आणल्यास त्याप्रकरणी लागवडीखालील क्षेत्राच्या आकारणीच्या प्रमाणात पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणल्यामुळे त्याकरिता जिल्हाधिकारी अतिरिक्त आकारणी करतील.त्याअनुषंगाने सर्व्हे नंबर / गट नंबर मधील पोटखराब वर्ग (अ ) क्षेत्रामध्ये जमीनधारकाने सुधारणा करून ते लागवडीखाली आणले असल्यास सदरचे क्षेत्र पोटखराब वर्ग ( अ ) मधून कमी करून ते लागवडीयोग्य क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे असे सांगितले.