पुणे :-
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या संकल्पनेतून शिक्रापूर ( ता.शिरूर ) येथील श्री. पोपट धोंडीबा वाबळे यांच्या शेतालगत वाहात असलेल्या ओढ्यावर श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला.
मागील उन्हाळ्यामध्ये याच ओढ्याचे खोलीकरण केले गेले.प्रगतशील शेतकरी साहिल वाबळे,कुणाल वाबळे, रमेश वाबळे, शिवाजी भुजबळ,कृषीसहाय्यक अशोकराव जाधव यावेळी उपस्थित होते.
ओढ्याचे खोलीकरण केले गेले असल्यामुळे तुडुंब पाणी साठा झाला आहे. यामुळे जवळील विहिरींचा पाणीसाठा भरपूर प्रमाणात वाढत आहे असे कृषीसहाय्यक अशोकराव जाधव यांनी सांगितले.
सन २०२२-२३ या वर्षात पर्जन्यमान मोठ्या प्रमाणात झालेले आहे त्यामुळे सध्या स्थितीत ओढे – नाले यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे.सध्या पावसाळा संपला असल्याने ओढे नाले यामधील वाहून जाणारे पाणी अडवून पिकांना संरक्षित सिंचन देणे , जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी वनराई बंधारे लोकसहभागातून घ्यावे लागेल.पाण्याचा प्रवाह पारंपारिक पद्धतीने अडवून पाण्याचा साठा करून बिगर पावसाळी हंगामातील पाण्याची गरज काही अंशी भागविण्यासाठी उपलब्ध साधनाचा (सिमेंट / खताची रिकामी पोती ,माती ,वाळू ई.) वापर करून बांधलेला बांध म्हणजे वनराई बंधारा होय.या पाण्याचा उपयोग गुरांना पाणी पिण्याकरिता, धुणी धुण्या करिता, वनराई बंधा-याच्या आजूबाजूला असलेल्या विहीरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याकरिता मदत होते व वनराई बंधा-याच्या पाणी साठ्यामधून पाण्याचा उपसा करून रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये भाजीपाला / कडधान्ये,कलिंगड यासारखी पिके घेण्यासाठी होतो.म्हणून अशा प्रकारचे वनराई बंधारे लोकसहभागातून शालेय ,कॉलेज विद्यार्थ्यांकडून श्रमदानातून करावे असे आवाहन महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने शिक्रापूर येथील कृषी सहाय्यक अशोकराव जाधव यांनी शेतक-यांना केले आहे.
एन टी व्ही न्यूज मराठीसाठी
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे 8975598628
