वाशिम:-दि.०७ जानेवारी, २०२३ ते १३ जानेवारी, २०२३ दरम्यान पुणे येथे पार पडलेल्या ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये वाशिम जिल्हा पोलीस दलातील अंमलदारांनी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्ण, कांस्य तसेच रजत पदकाची कमाई केली आहे.
पुणे येथील राज्य राखीव पोलीस गट क्र.१ व २ यांच्या मैदानावर ०७ दिवस चाललेल्या या स्पर्धांमध्ये राज्य पोलीस दलातील जवळपास ३२०० स्पर्धक खेळाडू पोलीस अधिकारी व अंमलदारांनी १८ प्रकारच्या क्रीडा स्पर्धामध्ये सहभाग नोंदविला होता. महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये अमरावती परिक्षेत्राच्या संघाने वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये दमदार कामगिरी करत ०७ सुवर्ण पदके, ०८ कांस्य पदके व १० रजत पदक प्राप्त करत एकूण २५ पेक्षा जास्त पदकांची कमाई केली आहे. त्यामध्ये वाशिम जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस अंमलदार मपोना.संगीता मारोती ढोले यांनी ‘पॉवर लिफ्टिंग’ या क्रीडा प्रकारामध्ये सुवर्ण पदक तर ‘पॉवर लिफ्टिंग’मध्येच मपोकॉ.निलोफर शेख यांनी कांस्य पदक पटकावत जिल्हा पोलीस दलाच्या शीरपेचात मानाचा तुरा रोवला. त्याचबरोबर सांघिक खेळामध्ये अमरावती परिक्षेत्राच्या व्हॉलीबॉल संघाने रजत पदक पटकावले आहे. त्या संघात वाशिम पोलीस दलातील पोलीस अंमलदार मपोकॉ.रेखा श्रावण कांबळे यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
दि.१४ जानेवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बक्षीस वितरण करत ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांचा थाटात समारोप करण्यात आला. त्यावेळी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.श्री.जयंत नाईकनवरे यांच्यासह परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षकांनी स्वतः सदर समारोहास उपस्थित राहून परिक्षेत्रातील खेळाडू पोलीस अधिकारी व अंमलदारांचे मनोबल उंचावले.
वाशिम पोलीस दलातील खेळाडू पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी पदक प्राप्त खेळाडू अंमलदारांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतीनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *