सोमेश्वरनगर,बारामती येथील युवा लेखक, प्रा.राहूल खरात यांची प्रतिक्रिया
पुणे : आत्मचरित्र लेखिका शांताबाई कांबळे यांच्या निधनाने दलित चळवळीचे अत्यंत नुकसान झाले अशी प्रतिक्रिया सोमेश्वरनगर,बारामती येथील युवा लेखक प्रा.राहूल खरात यांनी व्यक्त केली. मराठी साहित्यातील पहिल्या दलित स्त्री आत्मचरित्राच्या लेखिका शांताबाई कृष्णाजी कांबळे यांचे वयाच्या १०० व्या वर्षी बुधवारी सकाळी पुण्यात निधन झाले.
दलित पँथरचे नेते दिवंगत प्रा.अरूण कांबळे यांच्या त्या मातोश्री होत्या.शांताबाई कांबळे यांचा जन्म १ मार्च १९२३ रोजी आटपाडी येथे झाला.सोलापूर स्कूल बोर्डामध्ये त्यांनी पहिली दलित शिक्षिका म्हणूनही काम केले. यानंतर काही काळ सांगली जिल्ह्यातील जत मध्ये शिक्षण विस्तार अधिकारी म्हणूनही काम केले. निवृत्तीनंतर त्यांनी माझ्या जल्माची चित्तरकथा पुस्तकरूपाने लोकांसमोर मांडली.याच आत्मकथेवर आधारित दूरदर्शनवर १९९० मध्ये नाजुका या नावाने मालिका प्रसारित केली.या आत्मकथेचे फ्रेंच,इंग्रजी,हिंदी भाषेत पुस्तकरूपाने अनुवाद प्रसिद्ध झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,विठ्ठल रामजी शिंदे, तीरमारे गुरूजी यांचा सहवास त्यांना लाभला होता.
शांताबाई कांबळे यांच्या निधनाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील युवा लेखक,प्रा.राहूल खरात यांनी म्हटले, अत्यंत हलाखीच्या संघर्षमय परिस्थितीतून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि आपल्या मुलांचही आयुष्य चांगल्या पद्धतीने घडविले.आपल्या लेखनातून त्यांनी दलित, मागासवर्गीय स्त्रीचे जगणे किती कष्टप्रद असते आणि तिला किती संघर्ष करावा लागतो याची प्रचितीच आपल्याला आणून दिली होती. पुरोगामी समाजाला त्यांनी त्यातून आरसा दाखविला होता. त्यांच्या निधनाने दलित चळवळीचे अत्यंत नुकसान झाले असून त्यांचा विचार असाच पुढं जावो अशी अपेक्षा व्यक्त करतो.