उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील कोरेगाव येथील आयएसओ मानांकन प्राप्त जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा “दप्तराविना,एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात” या उपक्रम अंतर्गत शेतात भरविण्यात आली.मंगळवार दि14 रोजी शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक प्रवीण स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी प्रशांत खटके,ज्ञानोबा खटके यांच्या शेतात निसर्गशाळा भरविण्यात आली.

यावेळी येथील शेतकऱ्यांनी गहू,ज्वारी,हरभरा इत्यादी रब्बी पिके,ऊस,द्राक्ष ही बागायती पिके,आंबा चिकू,पेरू,जांभळं,केळी ही फळं तसेच टोमॅटो,गाजर,वांगी,कांदा,मिरची, मुळा,काकडी,मेथी,कोथिंबीर,पालक,चुका अश्या भाज्यांची विद्यार्थ्यांना माहिती दिली.यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी पेरणी,मळणी,नांगर, कूळव यासाठी लागणारी औजारे अगदी स्पर्श करून जिज्ञासू वृत्तीने माहिती संपादित करताना आढळून आले. तसेच आधुनिक शेतीपुरक व्यावसाय कुक्कुटपालन,जरशी गायी,म्हशी पालन याबाबत प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना सखोल माहिती देण्यात आली.

यादिवशी सकाळी शेतातच परिपाठ, अनुभवकथन,लेखन,कविता गायन,नृत्य,स्नेहभोजन आदी कार्यक्रम घेण्यात आले.गणवेशातील विद्यार्थी शेतात आलेले पाहून शेतकरी पालकांना आनंद झालेला दिसून आला.या विशेष उपक्रमाला उपसरपंच पांडुरंग खटके यांनी भेट दिली व शाळेचे,विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सधन शेतकरी प्रशांत खटके यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. ही विशेष निसर्ग शाळा यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक अशोक बिराजदार, लक्ष्मी वाघमारे यांच्यासह उमाचंद्र सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.
सचिन बिद्री