सचिन बिद्री:उमरगा
प्रा.शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाच्या वतीने उमरगा-लोहारा तालुक्यात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. या वाचनालयाच्या दोन्ही तालुक्यातील ग्रामीण भागात एकूण १५ शाखा असून उमरगा शहरात एक वाचन टपरी व दोन वाचन कट्टे आहेत.

वाचनालयाच्या प्रत्येक शाखेकडून दरवर्षी ग्रंथदिंडी काढण्यात येते. ग्रंथदिंडीच्या माध्यमातून समाजात वाचनाचे व ज्ञानाचे महत्व सांगितले जाते. देवा-धर्माच्या पारंपारिक दिंड्यांना विधायक वळण देत वाचनाचा, ज्ञानाचा जागर करणाऱ्या पुस्तकपालख्या व ग्रंथदिंड्या काढाव्यात अशी संकल्पना वाचनालयांचे संस्थापक ॲड. शीतल चव्हाण यांनी मांडली. या ग्रंथदिंडीत पुस्तके लावलेली दिंडी, महामानवांच्या विचारांचे फलक आणि भजनी मंडळांच्या माध्यमातून संतविचारांचा जागर करण्यात येतो.

दि.११ जून (रविवार) रोजी ही ग्रंथदिंडी वाचनालयाच्या उमरगा तालुक्यातील कदमापूर शाखेच्या वतीने काढण्यात आली. यंदा ग्रंथदिंडीचे दुसरे वर्ष आहे. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन व तमाम महामानवांना अभिवादन करुन ग्रंथदिंडीची सुरुवात करण्यात आली. गावात सर्वत्र ग्रंथदिंडीफिरवण्यात आली, तिचे जागोजागी स्वागत करण्यात आले. वाचन करण्याचा संदेश तमाम गावकऱ्यांना देण्यात आला.
वाचनालयाच्या इमारतीत ग्रंथदिंडीची सांगता करुन वाचनाचे महत्व या विषयावर मान्यवरांची भाषणे झाली. प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादनही करण्यात आले.
याप्रसंगी परमेश्वर देवस्थानचे आशुतोष महाराज, देविदास तरमुडे, संदिपान भले, सत्यनारायण जाधव, राजू बटगिरे, किशोर औरादे, ज्योती ममाळे, दादा माने, किशोर बसगुंडे यांच्यासह गावातील अबालवृद्ध सहभागी झाले होते. गावात वाचनालय झाल्याने आणि वाचनालयाच्या वतीने ग्रंथदिंडीसारखे विविध उपक्रम राबवले जात असल्याने जागृती व चैतन्य निर्माण झाल्याची भावना गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.