देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाची पर्वा न करता अहोरात्र देशाची २१ वर्षे रक्षण करुन भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्त होऊन घरी परतले सैनिक दिलीप यशवंत चौधरी यांची वणी येथील नागरिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत वाजत-गाजत मिरवणूक काढून त्यांचा सपत्नीक सत्कार केला. देशसेवा करताना निवृत्त झालेल्या सैनिकांची छाती या आगळ्यावेगळ्या सन्मानाने फुलून आली. या वेळी भावना मोकळ्या करताना आनंदाश्रूही आले.
भारतीय सैन्य दलात विविध संकटांना सामोरे जात देशाचे रक्षण करणारे जवान भारतमातेचे भूषण असतात. अशा सैनिकांचा ग्रामस्थांना अभिमान असल्याने त्यांचा आदर्श गावातील नव्या उमेदीच्या तरुण पिढीने घ्यावा. या हेतूने सेवानिवृत्त होवून घरी परतणारे सैनिक दिलीप चौधरी यांची मिरवणूक काढून त्यांचा सन्मान करण्याचे वणी येथील भगवती कॉलनी व शनि चौकातील ग्रामस्थांनी ठरविले होते. आज सकाळी सैनिक दिलीप चौधरी यांचे वणी बसस्थानकात आगमन होताच त्यांचे फुलमाळांनी सजवलेल्या उघड्या जीपमधून त्यांची ध्वनीप्रक्षेपकावर देशभक्तीपर गीते लावून फुलांचा वर्षाव करीत व ‘भारत माता की जय’ वंदे मातरम् चा जयघोष करीत मिरवणूक काढण्यात आली. गावातील चौकाचौकात फटाक्यांची आतीषबाजी करुन ग्रामस्थांनी सैनिक दिलीप चौधरी यांचे स्वागत केले. मिरवणूकीत देशभक्तीच्या वातावरणात महिलांनी या सैनिकाचे औक्षणही केले. गावातील महिला, पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते. नागरिकांचा उत्साह पाहून तेही भावुक झाले. मिरवणूक देवी मंदीरात गेल्यानंतर जगदंबा देवी ट्रस्टच्यावतीने पोपटराव थोरात, गणेश देशमुख, अमोल देशमुख, दुर्गेश चितोडे आदींनी स्वागत करीत सत्कार केला. मिरवणूकीचे नियोजन जमिर शेख, सुरेश जाधव, गणेश पिगंळे, अरुण गांगोडे, दत्तू चौधरी, विशाल जाधव, रोहित पिंगळे, रोहन बोरसे, किशोर साखला, सचिन वर्मा, मंगला चौधरी, रंजना पिंगळे, सरला चौधरी, शोभा साखला आदीॆसह भगवती कॉलनी व राधा कृष्ण महिला मंडळाने केले. दरम्यान वणी ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलास कड यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनीही त्यांचा यथोचित सत्कार केला.
दिगंबर पाटोळे वणी नाशिक