सचिन बिद्री:उमरगा
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने नोकरभरतीसाठी काढलेल्या जाहिरातीमध्ये धाराशिव व लातूर जिल्ह्यातील भूकंपग्रस्त सुशिक्षित बेरोजगारांना आरक्षित 2 टक्के कोटयानुसार केवळ 6 जागा ठेवल्या असल्यामुळे भूकंपग्रस्तावर अन्याय झाला असून 2 टक्के कोटयानुसार 38 जागा आरक्षित ठेवून पुनःश्च जाहिरात काढण्याची मागणी शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे महाराष्ट्र राज्य चिटणीस सातलिंग स्वामी यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने 20 नोव्हेंबर 2023 रोजी नोकरभरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यात एकूण 1903 (एक हजार नऊशे तीन ) जागा भरण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. एकुण 1903 जागेपैकी भूकंपग्रस्तांच्या दोन टक्के कोटयानुसार एकूण 38 जागा वाटयाला येतात.मात्र महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने दोन टक्के जागेनुसार 38 जागा देण्याऐवजी भूकंपग्रस्तांवर अन्यायकारकरीत्या केवळ सहा जागा आरक्षित असल्याचे दर्शविले आहे

हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने मुख्य महाव्यवस्थापक ( मानव संसाधन ) यांच्या अधिकारामध्ये काढण्यात आलेल्या विद्युत सहाय्यक या पदाच्या जाहिरातीत एकूण 1903* पदासाठी काढण्यात आलेली जाहिरात अन्य आरक्षित प्रवर्गानुसार भूकंपग्रस्तांसाठी आरक्षित असलेल्या एकूण दोन टक्के आरक्षणानुसार 38 जागा राखीव ठेवून सदर जाहिरात पुनःश्च काढण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी सातलिंग स्वामी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंबई येथे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.