◆गाळे धारकांची न्यायालयातून माघार
◆उमरखेड प्रतिनिधी-/ मागील अनेक वर्षांपासून न्यायालयीन,राजकीय श्रेयवाद व इतर प्रशासकीय बाबींमुळे छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळा स्थापना प्रक्रिया रखडून होती. त्यात काही असंतुष्टांकडून सामाजिक तेढ निर्माण व्हावा याउद्देशाने आंदोलने उभारून प्रशासनास वेठीस धरण्याचे काम केल्या जात होते.
मात्र भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा,उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आ.नामदेवराव ससाणे, नितीन माहेश्वरी, विजयराव माने यांच्या पुढाकारातून दि.18 जुलै रोजी झालेल्या समन्वय बैठकीत पुतळा उभारणीचा मार्ग सुकर करण्यात आला.
न्यायालयात गेलेल्या चारही व्यवसायिकांनी माघार घेतल्यामुळे छत्रपती शिवरायांच्या अश्वआरूढ पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना लवकरच करण्यात येणार असल्याचे यावेळी नितीन भुतडा यांनी सांगितले.ते दि.23 जुलै रोजी त्यांचे लोटस या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषेदेत बोलत होते. यावेळी स्थानिक आ.नामदेवराव ससाणे,माजी आ.प्रकाश पाटील देवसरकर, माजी आ.विजयराव खडसे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा संघर्ष समितीचे विलासराव चव्हाण, देविदास शहाणे, अमोल नरवाडे, सुनील शहाणे, आपला जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीचे अध्यक्ष शिवाजीराव माने, उपाध्यक्ष ऍड.जितेंद्र पवार, जिप.सदस्य चितांगराव कदम, दत्तदिगंबर वानखेडे, प्रकाश दुधेवार, भीमराव पाटील चंद्रवंशी, तातेराव हनवते आदीजन प्रामुख्याने उपस्थित होते.
भुतडा यांनी दि 31 ऑगस्टपर्येंत छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुतऱ्याचे भूमिपूजन छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाच्याचं शुभहस्ते करण्यात येणार असल्याचे देखील यावेळी ठासून सांगितले.
नगरपालिकेतील तत्कालीन सत्ताधारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाची निर्मिती करतांना छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासाठी जागेचे नियोजन का नाही केले..? असा प्रतिसवाल करीत भुतडा यांनी कुळवाडी भूषण छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणीसाठी तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक जागेची अडचण निर्माण करून ठेवली व आज मितीस तेच लोकं पुतळा उभारणीसाठी आंदोलने करीत असल्याचे सांगितले. छत्रपतींची अस्मिता जोपासण्यात कुठेही उणीव भासू देणार नसल्याचे देखील यावेळी भुतडा यांनी सांगितले
नगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा नगरपालिकेच्या मालकी हक्काच्या सेंट्रल नाक्याच्या जागेवर करण्याचे नियोजित झाले असतांना स्थानिक पुतळा कृती समितीच्या वतीने सण 2018 साली त्यास विरोध करण्यात आला होता.
तद्नंतर पुतळा उभारणीसंदर्भात अनेक घटना घडामोडी घडल्या. दि.1 ऑक्टोबर 2020 रोजी नगरपालिकेच्या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात शक्य त्या जागेवर पुतळा उभारणीसाठी 5 सदशीय सर्वपक्षीय समिती गठीत करण्यात आली. यामध्ये समितीस पुतळा बसविण्या संदर्भातील सर्वतोपरी अधिकार प्रदान करण्यात आले. मात्र सर्व समिती सदस्यांनी आठवड्याभरातच राजीनामे दिल्याने पुतळा उभारणीचे भिजत घोंगडे जैसेथे राहिले होते.
यादरम्यान पुतळा कृती समिती व नगरपालिका प्रशासनाच्या वतीने बऱ्याच बैठका पार पडल्यात मात्र यश आले नाही. सण 2022-23 मध्ये नगरपालिकेच्या मालकी हक्काचे रा.प्र.उत्तरवार व्यापारी संकुलातील चार दुकाने पाडून तसेच त्यालगतच्या न.प. च्या काही जागेत पुतळा उभारण्याचे सर्वानुमते निश्चित झाले. तसा ठराव ही नगरपालिका बैठकीत सम्मत करण्यात आला. यासंदर्भात विविध विभागाच्या ना हरकती ही प्राप्त झाल्या.
पुतळा उभारणीस आवश्यक असणारी नगरविकास मंत्रालयाची ना हरकत दि.1 फेब्रुवारी 2024 रोजी प्राप्त झाली. भव्य चबूतऱ्याचे बांधकाम करण्याची तांत्रिक मान्यता दि.2 फेब्रुवारी 2024 रोजी मिळाली.त्यानुसार प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडे दि.16 फेब्रुवारी 2024 रोजी पाठविण्यात आला,जिल्हाधिकारी यांनी तो प्रस्ताव दि.20 फेब्रुवारी रोजी शासनाकडे वळता केला. मात्र त्यास अंतिम मंजुरात मिळाली नाही. त्यामुळे आजही तो प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव प्रलंबित आहे.
◆नगरपालिकेच्या मालकी हक्काची चार दुकाने पाडून तेथे पुतळा चबुतरा बांधकाम व पुतळा उभारण्याचे नगरपालिकेमध्ये ठरल्यानंतर, दुकान गाळे धारकांनी दुकानगाळे शाबूत राहावी यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. पैकी दोन दुकान मालकांना माननीय न्यायालयाने स्थग्नादेश ही दिला तर उर्वरित दोन दुकान मालकांची प्रकरणे न्यायप्रविष्ठ होती.
आज झालेल्या बैठकीत चारही दुकान गाळे धारकांना पर्यायी व्यवस्था म्हणून जिनिंग & प्रेसिंगच्या जागेवरील प्रस्तावित भव्यदिव्य व्यापारी संकुलामध्ये दुकान गाळे देणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार चारही गाळे धारकांनी दि.1 ऑगस्ट रोजी दुकान खाली करून देण्याचे मान्य केले.व दुकाने पाडून त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीस ना हरकत दिली. व आयोजित पत्रकार परिषेदेमध्ये गाळे धारक उपस्थित होते हे विशेष..छत्रपती शिवरायांबद्दलचा आदर जोपासत न्यायालयातून माघार घेतल्याबद्दल गाळे धारकांचा सन्मानजनक सत्कार देखील याप्रसंगी करण्यात आला.
प्रशासकीय मान्यता व न्यायालयाची स्थगिती यामुळे थंड बसत्यात असलेल्या पुतळा उभारणीच्या कामातील न्यायालयीन अडथळा हा दूर झाला आहे. पुतळा उभारणीस लागणारी प्रशासकीय मान्यता ही लवकरात लवकर मिळणार असल्याचे नितीन भुतडा यांनी यावेळी सांगितले.