माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरातील सात ओपन स्पेसमध्ये उद्यानासाठी नवीन प्रस्ताव तयार करण्यात आला होता. पर्यावरण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने बक्षिसाच्या रकमेतून नव्याने सहा कोटींच्या निधीतून उद्याने व सौरउर्जा प्रकल्पास शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. 


शहरातील सावेडी, केडगाव, बोल्हेगाव, मुकुंदनगर, सारसनगर, बुरूडगाव रस्ता भागात महापालिकेच्या ओपन स्पेसवर नव्याने उद्याने प्रस्तावित केली आहेत. त्यासाठी राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाकडे पाठपुरावा सुरू होता. राज्य शासनाच्या पर्यावरण विकास विभागाने ६ ऑगस्ट २०२४ रोजी आदेश काढून नगर शहरातील सुमारे ७ उद्यानांसाठी प्रशासकीय मान्यता देत सुमारे ६ कोटीचा निधी मंजूर केला. त्यामुळे नगर शहरातील उद्यानांमुळे शहरातील सौंदर्यात भर पडणार आहे.