आकाशवाणी एफएम सेवेचं हे अहमदनगर केंद्र आहे. संध्याकाळचे सहा वाजलेत. सुरु करीत आहोत आमची तिसरी प्रसारण सभा, अहमदनगर आकाशवाणी केंद्राची बंद केलेली संध्याकाळची प्रसारण सभा १५ ऑगस्ट २०२४ पासून पुन्हा सुरु होत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून air आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे सायंकालीन प्रसारण बंद करण्यात आले होते. त्यामुळे आकाशवाणी केंद्रावर कार्यरत असलेल्या हंगामी निवेदकांच्या रोजगारावरही परिणाम झाला होता. सायंकाळचे बंद केलेले प्रसारण पुन्हा सुरु करण्यात यावे अशी हंगामी निवेदकांसह अनेक रेडिओप्रेमींची मागणी होती. ती आता पूर्ण होत आहे. यासाठी आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी राजेंद्र दासरी, सुदाम बटुळे, हंगामी निवेदक आदिनाथ अन्नदाते, अतुल सातपुते, संतोष मते, गौरी जोशी, अंजली बडवे, रेखा शेटे, महेश्वरी मिसाळ आदिंनी मोठा पाठपुरावा केला होता.

आकाशवाणी अहमदनगर केंद्राची संध्याकाळची प्रसारण सभा सुरु होत असली तरी सध्या सुरु असलेल्या कार्यक्रमांच्या दर्जाबाबत श्रोत्यांच्या मनांत असंतोष आहे. अनेक लोकप्रिय कार्यक्रम आकाशवाणीचे तत्कालिन कार्यक्रम अधिकारी प्रदीप हलसगीकर यांच्या काळात बंद करण्यात आले. सकाळी नऊचे कार्यक्रम खऱ्या अर्थाने श्रोत्यांसाठी मेजवानी असायची. या कार्यक्रमांमधे महेश्वरी मिसाळ यांचा गप्पा आणि गाणी, अंजली बडवे सादर करत असलेला कार्यक्रम, सायली जोशी यांचा सुगरण, बाप लेकी, उन्हाळे – पावसाळे, हसा की राव अशा कार्यक्रमांचा समावेश होता. श्रोत्यांच्या विशेष आवडीचा आणि नगरी बोली भाषेत सादर केला जाणारा किरण डहाळे यांचा ‘नगरी नगरी’ कार्यक्रम का बंद करण्यात आला? हे एक गौडबंगाल आहे. यासंदर्भात नगरी नगरीचे सादरकर्ते किरण डहाळे यांच्याशी संपर्क साधला असता, कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय तत्कालिन कार्यक्रम अधिकारी यांचा होता व त्यानंतर कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याबाबत कुणीही आपल्याशी संपर्क साधला नसल्याचे सांगितले.

संध्याकाळचे प्रसारण पुन्हा सुरु होताना जुन्या जाणत्या निवेदकांना, कलावंतांना सोबत घेऊन नव्या संकल्पना राबवून मरगळलेल्या आकाशवाणीला पुन्हा ऊर्जितावस्था आणण्याचे शिवधनुष्य राजेंद्र दासरी आणि सुदाम बटुळे या अधिकाऱ्यांना पेलायचे आहे. अहमदनगर आकाशवाणीचे संध्याकाळचे प्रसारण पुन्हा सुरु होत असल्याचा आनंद असला तरी जुने चांगले कार्यक्रम बंद केल्याबाबत श्रोत्यांच्या मनात नाराजीची भावना आहे. कार्यक्रम अधिकारी राजेंद्र दासरी जुने लोकप्रिय कार्यक्रम पुन्हा सुरु करतील, अशी श्रोत्यांची अपेक्षा आहे.