पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाचा सन २०२१-२२ च्या आर्थिक वर्षाच्या बंधित निधीच्या दुसर्या हप्त्यापोटीचा निधी आता ग्रामपंचायतींना मिळणार आहे. यात नगर जिल्ह्यातील एकूण १३२३ ग्रामपंचायतींचा ४५ कोटी २३ लाख ७८ हजार रुपयांचा समावेश आहे. या निधीमुळे या ग्रामपंचायती मालामाल होणार असून गावागावांतील विविध कामांना वेग येणार आहे.

पंधराव्या वित्त आयोगामधून ग्रामपंचायतींना विविध विकास कामांसाठी निधी मिळणार आहे. या निधीपैकी ८० टक्के निधी हा थेट गावांच्या विकासासाठी ग्रामपंचायतींना वितरीत केला जातो. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना प्रत्येकी १० टक्के निधी दिला जातो. गावांना मोठा निधी मिळाल्याने गावांमधील विविध पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळते. त्यामुळे गावपातळीवरील विकासकामांना वेग येणार आहे.
