जिल्ह्यात आगामी काळात साजरे होणारे गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद यासह इतर सण निर्विघ्नपणे व शांततेत साजरे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, महापालिका आयुक्त डॉ. यशवंत डांगे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, ”जिल्ह्यात साजरे होणारे सण, उत्सव गुण्यागोविंदाने साजरे करण्याची आपल्या जिल्ह्याची परंपरा आहे. जिल्ह्याची ही परंपरा कायम ठेवत आगामी काळात जिल्ह्यात साजरे होणारे सण, उत्सव हे शांततेत, एकमेकांच्या हातात हात घालून साजरे करावेत. जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी पर्यावरण पूरक, संस्कृतीचे जतन करणारे व ध्वनी प्रदुषणमुक्त गणेशोत्सव साजरा करावा.अशा मंडळांना पारितोषिक देण्यात येणार आहे,” ते म्हणाले. तसेच या सण, उत्सवादरम्यान रस्त्यांची दुरुस्ती, स्ट्रीटलाईट यासह इतर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
