येत्या ३ सप्टेंबरपासून एसटी कर्मचारी मोठं आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. एसटी कर्मचारी कृती समितीने सरकारला इशारा दिला असून ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. राज्यातील एसटी कर्मचारी संघटनेच्या कृती समितीची नुकतीच बुलढाणा येथे बैठक झाली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यानुसार वेतन देण्यात यावं, ही मागणी करण्यात आली. परंतु, ती मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अतिसंवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रातील जनतेला न्याय देत असताना त्यांनी कर्मचाऱ्यांना देखील न्याय द्यावा. वेतन आयोगाच्या धर्तीवर करार करून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार वाढ द्यावी, अन्यथा कृती समितीच्या माध्यमातून ३ सप्टेंबरपासून एसटी कर्मचारी मोठे आंदोलन छेडतील, असा इशारा त्यांनी दिला.