🛑जुन्या महापालिकेत जन्म मृत्यू नोंदणी नावाच्या कारभाराबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने महानगर पालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी आज (शुक्रवारी) अचानक या विभागात भेट दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. काही कर्मचारी जागेवर उपस्थित नव्हते. त्यांची आयुक्तांनी झाडाझडती घेतली. काही नागरिक दाखल्यांच्या प्रतीक्षेत होते. आयुक्त यशवंत डांगे यांनी नागरिकांशी संवाद साधून तक्रारी ऐकून घेतल्या. त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांना त्यांनी फैलावर घेतले. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनाही त्यांनी खडेबोल सुनावले. नागरिकांना वेळेत सुविधा देण्याच्या दृष्टीने नियोजन करा. अर्ज प्रलंबित ठेऊ नका. कामकाजात सुधारणा करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. कामकाजात सुधारणा न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

🛑महापालिकेने चारही प्रभाग समिती कार्यालयामार्फत जन्म मृत्यू नोंदणी व दाखले वितरण सुरू केले आहे. यापुढे त्या त्या प्रभाग समितीच्या हद्दीतील नागरिकांनी संबंधित प्रभाग कार्यालयात अर्ज करावेत व शुल्कही तेथे भरावे. जुन्या महापालिकेत फक्त तेथील प्रभाग समिती कार्यालयाच्या क्षेत्रातील नागरिकांनाच दाखले मिळतील. त्यामुळे नागरिकांनी एकाच ठिकाणी गर्दी न करता आपापल्या प्रभाग समिती कार्यालयात अर्ज करून दाखले घ्यावेत, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.