मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांना निवेदनाद्वारे स्वामींनी केली मागणी
(सचिन बिद्री:धाराशिव)
गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस आणि रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांच्या हातातोंडांशी आलेला घास निसर्गाच्या प्रकोपाने हिरावला असून सर्व शेतकरी आर्थिक संकटात आल्याने पंचनामे न करता सरसकट हेक्टरी 1 लाख रुपयांची तात्काळ आर्थिक मदत करा अशी मागणी उमरगा लोहारा विधानसभा क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते तथा अखिल भारतीय वीरशैव युवक शिवा संघटनेचे राज्य चिटणीस सातलिंग स्वामी यांनी दि 10 रोजी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्याकडे मागणी केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,उमरगा लोहारा तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यात
झालेल्या अतिवृष्टीसह बुरशीजन्य व किडींच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन,मूग, उडीद आदीसह अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे न करता सरसकट हेक्टरी एक लाख रुपयांची नुकसान भरपाई तात्काळ द्यावी. गेल्या २० ते २५ दिवसांपासून जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस होऊन अतिवृष्टी झालेली आहे त्यातच बुरशीजन्य व कीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे उमरगा,लोहारा, तालुक्यासह जिल्हयातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक सोयाबीनसह अन्य पिकांचे
अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास नैसर्गिक प्रकोपामुळे हिरावला गेला आहे. वर्षातील सर्वात मोठा सण दिवाळी कशी साजरी करायची?संपूर्ण वर्षाचे आर्थिक गणित कोसळल्याने, बँकेचे व खाजगी सावकाराचे कर्ज कसे फेडायचे?आणि मुलींच्या लग्नाची चिंताही सतावत असल्याने शेतकरीवर्ग कोलमडला असून जाहीर केलेल्या ४८९२ रुपये म्हणजेच सरासरी ५,०००/- रुपये हमी भावाप्रमाणे
शेतकऱ्यांचे सरासरी एकरी दहा क्विंटल उत्पन्न ग्राहय धरले तर एकरी ५०,०००/- रुपये प्रमाणे हेक्टरी १,२५,०००/- रुपये उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे शासनाने सारासार विचार करून हेक्टरी किमान १ लाख रुपये नुकसान भरपाई दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना द्यावी व भविष्यात होणाऱ्या आत्महत्या थांबवाव्यात अशी विंनती करण्यात आली आहे.