♦️युवक संघटनेच्या माध्यमातून मी सुध्दा कार्यकर्ता म्हणून काम केले. माझ्या बरोबरच्या अनेक कार्यकर्त्यांना विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली याचे एकमेव कारण त्यांनी संघटनेशी ठेवलेली बांधिलकी. मात्र, आता युवकांना आपल्याला संघटनेत जोडून घ्यायचे आहे. आपल्याला युवा मंचात जात आणि धर्माला थारा नाही तर फक्त विकासाच्या विचाराला स्थान आहे, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.


♦️जनसेवा युवा मंचाच्या वतीने आयोजित केलेल्या युवक आणि युवतींच्या मेळाव्यात डॉ. सुजय विखे पाटील यांनी युवकांशी संवाद साधत युवा मंचाच्या कार्याचे महत्व विषद केले. २० हजारांहून अधिक युवक आणि युवती या मेळाव्यास उपस्थित होते. ते म्हणाले की, जनसेवा युवा मंच आपले कुटूंब आहे. जात आणि धर्माच्या पलिकडे जाऊन युवकांच्या उज्वल भवितव्याचा आणि समाज उभारणीचा अजेंडा युवा मंचाचा असेल. विचारांच्या आधारावर जनसेवा युवा मंचाचे संघटन विकास आणि सामाजिक एकोप्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.