( एन टीव्ही न्यूज चे प्रतिनिधी – मनोहर तावरे यांजकडून )
शेतकऱ्यांच्या जळीत दुर्घटनेचा आठ महिने पंचनामा झालाच नाही……
सरकारी काम आणि सहा महिने थांब ही मराठी वाङ्मयात वापरली जाणारी म्हण खरी आहे. परंतु याच्याही पुढे एक पाऊल टाकत बारामतीच्या महसुली विभागात तब्बल आठ महिने जळीचा पंचनामाच केला नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलय…….
ही घटना दुसरीकडे कुठे नाही. तर ? नुकत्याच बिग बॉस जिंकलेल्या गोलीगत सुरज चव्हाण यांच्याच गावातील आहे. गावात राहणारे शेतकरी भागुजी बनकर यांचे शेत जमीन गट नंबर. ३६ येथे ९ एप्रिल २०२४ रोजी विद्युत लाईटचे शॉर्टसर्किट होऊन सुमारे एक एकर तसेच लिंबोणी असलेली बाग व यातील ठिबक सिंचन जळून खाक झाले. या शेतकऱ्याने रीतसर या घटनेची महसूल चे तलाठी विद्युत वितरण कंपनी व सोमेश्वर सहकारी साखर कारखाना यांना लेखी अर्ज देऊन पोहोच घेतले आहेत.
येथील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नुकसानीची मदत देण्याचा शासकीय शिरस्ता असतो. मात्र येथील मुख्य दुवा म्हणून गाव कामगार तलाठी यांचा पंचनामाच झाला नसल्याने हा शेतकरी अडचणीत आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाले तरी तुटपुंजी का होईना सरकारी मदत मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे.
रजेवर तलाठी मग ? पंचनामा कोणाचा…
ही दुर्घटना घडली त्या दिवशी मोढवे गावातील तलाठी रजेवर होते. त्यांचा चार्ज शेजारी असलेल्या ‘मुर्टी’ येथील तलाठ्यांकडे होता. त्यांना तसा रीतसर देऊन नुकसानीचा पंचनामा व्हावा अशी मागणी केली. परंतु आज तब्बल आठ खेट्या घालूनही नुकसानीचा पंचनामा काही झालाच नाही.
आंबट लिंबाची कडू लिंब म्हणून केली नोंद ….
या प्रकरणात विद्युत वितरण कंपनी च्या स्थानिक अधिकाऱ्यांनी भेटीत आंबट लिंबोणीची बाग असा स्पष्ट उल्लेख केला नसल्याने वरिष्ठ कार्यालयात प्रस्तावात विद्युत निरीक्षकाने कडुलिंबाच्या झाडाची जळीत असा चुकीचा संदर्भ नोंदवला. एकूणच संपूर्ण शासकीय कामकाजाची दिशा स्पष्ट होते.
गेल्या आठ महिने शेतकरी नुकसानीच्या भरपाईसाठी सरकारी कार्यालयात खेट्या घालून कंटाळला आहे आता तरी दखल घ्या अशी मागणी त्यांनी आता माध्यम प्रतिनिधींकडे केली आहे.