स्वामित्व योजनेंतर्गत सनदचे वितरण
यवतमाळ, दि.१८ गावठाणातील प्रत्येक मिळकतधारकांना त्यांच्या मिळकतीची सनद उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने प्रधानमंत्री स्वामित्व योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा सर्वसामान्य गरीब मानसाला लाभ होईल, असे राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उईके यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात श्री.उईके यांच्याहस्ते प्राधिनिधीक स्वरुपात काही लाभार्थ्यांना योजनेंतर्गत सनद वाटप करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख प्रतिक मोकाशी आदी उपस्थित होते.

सर्वसामान्य माणूस सुखी, समाधानी झाला पाहिजे, यासाठी शासन विविध प्रकारच्या योजना राबविते. प्रधानमंत्री स्वामित्व योजनेसह केंद्र व राज्य शासनाच्या ईतरही योजना सर्व विभागांनी पुढाकार घेऊन राबवाव्यात, असे पुढे बोलतांना श्री.उईके म्हणाले. स्वामित्व योजनेंतर्गत मिळकतींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करुन तयार करण्यात आलेल्या जिल्ह्यातील १० लाभार्थ्यांना त्यांच्या मिळकतींचे सनद श्री.उईके यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
देशभर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ५० हजार गावातील ५८ हजार लाभार्थ्यांना सनदचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी व्यसनमुक्तीची सामुहिक शपथ घेण्यात आली.

प्रतिनिधी कलीम खान यवतमाळ