मुंबई | ०६ फेब्रुवारी : लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. संझगिरी यांनी मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले, द्वाराकानाथ संझगिरी म्हणजे क्रिकेटचा कोष. क्रिकेट, फिरस्ती, खानपान आणि जगणं यावर मनमुराद प्रेम करणारा हा कलंदर. एखादा क्रिकेटचा सामना मन लावून पहावा आणि त्याचे रसभरीत वर्णन संझगिरी यांच्या लेखात वाचून आणखी आनंद घ्यावा, ही मराठी क्रिकेटप्रेमीची वर्षानुवर्षाची परंपरा. मराठी क्रीडाप्रेमीना त्यांनी नवी दृष्टी दिली. त्यांच्यासोबत गप्पा मारणं हा एक सोहळा असायचा. पण गप्पांची मैफल अर्ध्यावर सोडून संझगिरी गेले. आपल्या लिखाणातून ते सदैव आमच्यात राहतील. द्वारकानाथ संझगिरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
पेशानं सिव्हिल इंजिनीयर असलेले संझगिरी मुंबई महापालिकेत उच्च पदावर कार्यरत होते. पण क्रिकेट आणि मराठी साहित्यातल्या रुचीनं त्यांच्यातला क्रिकेट समीक्षक घडवला. द्वारकानाथ संझगिरी यांनी 1983 पासून ते आजपर्यंतचे सर्व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्ल्ड कप देखील कव्हर केले आहेत. स्तंभलेखनाव्यतिरिक्त, संझगिरी यांनी प्रवास, सामाजिक समस्या, क्रीडा आणि चित्रपट अशा विविध विषयांवर 40 पुस्तके लिहिली आहेत.