पुणे, ०७ फेब्रुवारी : हिंदू गर्जना प्रतिष्ठान, पुनीत बालन ग्रुप व शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला- पुरुष राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय भव्य कुस्ती स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुण्यासह पिंपरी, चिंचवड, बारामती, मावळ, हवेली, शिरूर, मुळशी, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हे या वेगवेगळ्या भागातून कुस्तीपटू सहभागी झाले आहे. या सोहळ्याच्या उदघाटन प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

आज या स्पर्धेस चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून कुस्तीचा आस्वाद घेतला. तसेच खेळाडुंना प्रोत्साहन देखील दिले. दिनांक ७,८ व ९ फेब्रुवारी रोजी स प महाविद्यालय टिळक रोड येथे हा कुस्ती सोहळा पार पडणार आहे. या वेळी क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे, आयोजक धीरज घाटे हे देखील उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी तब्बल ४५ लाखांची बक्षिसे असून खुल्या विजेत्याला महिंद्रा थार गाडी, चांदीची गदा आणि २ लाख ५१ हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे. शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने ही स्पर्धा घेतली जात आहे. टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेत खुला गट हा राज्यस्तरीय पुरुष आणि महिला असा असणार असून इतर गट पुणे शहर आणि जिल्हा अशा स्वरूपाचा असणार आहे. पुणेकरांनी या स्पर्धेसाठी उपस्थित राहून मातीतील कुस्तीचा थरार अनुभवावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.