सायबर गुन्हे व महिला सुरक्षेवर नागरिकांना मार्गदर्शन
यवतमाळ: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ, जिल्हा प्रशासन, यवतमाळ व तालुका विधी सेवा समिती, आर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने जवळा (ता. आर्णी येथे ‘शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली, तसेच सायबर गुन्हे, महिलांविषयी गुन्हे आणि डिजिटल अरेस्ट यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले. जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, उप विभागीय पोलीस अधिकारी रजनीकांत चिलुमुला, पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्यासह उच्च न्यायालय विधी सेवा उप समिती नागपूरचे सचिव अनिलकुमार शर्मा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव कुणाल नहार, आर्णी विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश व्ही.एम. धोंगडे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय जैन, आर्णी तालुका वकील संघाचे अध्यक्ष दुर्गादास राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात पोलीस स्टेशन आर्णीचे अधिकारी आणि सायबर व महिला भरोसा पथकाच्या सहा. पोलीस निरीक्षक सातव मॅडम आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सायबर गुन्ह्यांची माहिती दिली. सध्याच्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे. महिलांविषयी गुन्ह्यांच्या बाबतीत, महिला भरोसा पथकाने महिलांना त्यांच्या हक्कांची आणि सुरक्षेची माहिती दिली. तसेच, डिजिटल अरेस्ट म्हणजे काय आणि त्यापासून कसे वाचावे, याबद्दलही माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमात नागरिकांना माहितीपत्रके वाटण्यात आली, ज्यामध्ये सायबर गुन्हे आणि महिला सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या सूचना आणि संपर्क क्रमांक देण्यात आले होते. या कार्यक्रमाला जवळा गावातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

प्रतिनिधी कलीम खान यवतमाळ