गंगापूर/प्रतिनिधी अमोल पारखे
गंगापुर येथील गट साधन केंद्राला लागलेल्या भीषण आगीत विद्या र्थासाठी राखीव ठेवलेली नवीन पाठ्यपुस्तके, गणवेश आणि महत्त्वाचे दस्ताऐवज जळून खाक झाले.
ही घटना शुक्रवारी सकाळी ७:२० वाजता घडली. पंचायत समिती आवारात कचऱ्याने पेट घेतल्यानंतर आग गट साधन केंद्रात पसरली. नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण साहित्य भस्मसात झाले. माहिती मिळाली तरीही गंगापूर नगर परिषदेची अग्निशमन गाडी वेळेवर तब्बल दोन तास पोहोचू शकली नाही. गाडीत पाणी नव्हते आणि चाकांची हवा कमी झाल्याने मोठा विलंब झाला. अखेर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अग्रिशमन गाडीने आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. दरम्यान, या आगीत विशेषतः पहिली व दुसरीच्या विद्याथ्यांसाठी आलेली नवीन पाठ्यपुस्तके आणि गणवेश जळाले. विशेष म्हणजे, हे साहित्य अद्याप विद्यार्थ्यांना वाटप झालेले नव्हते. हे साहित्य केंद्रात इतके दिवस
का ठेवले गेले आणि वेळेवर वाटप का झाले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे शैक्षणिक साहित्यांसह
विद्यार्थ्यांचे मोठे नुक्सान कोण भरून काढणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गटशिक्षण अधिकाऱ्यांची माहिती
देण्यास टाळाटाळ
या आगीत एकूण किती नुकसान झाले, याची माहिती गटशिक्षण अधिकारी समाधान आराक यांना विचारली असता, “आम्ही अद्याप मोजमाप केले नाही, “असे उत्तर देत त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.
शिक्षकांच्या सेवा पुस्तिका सुरक्षित
गट साधन केंद्रातील दुसऱ्या खोलीत जिल्हा परिषद शिक्षकांच्या सेवा पुस्तिका होत्या. सुदैवाने, आग वेळीच लक्षात आल्याने त्या सुरक्षित राहिल्या. या घटनेची तातडीने चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी त्वरित पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी पालक आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.