भाविकांच्या फसवणुकीचे प्रकार
देशातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र अशी ओळख असलेल्या अष्टविनायकातील ‘मोरगाव’ येथे सध्या एक नवीन समस्या सुरू आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना वाहन तळावर तसेच रस्त्यात गाठून भविष्य सांगण्याच्या नावाखाली फसवणूक झाल्याचे काही प्रकार समोर आलेत. या ज्योतिषांचा बंदोबस्त करावा अशी मागणी अनेक जाणकारांनी केली आहे. पोलीस प्रशासनाने याबाबत दखल घेण्याची गरज आहे.
मोरगाव हे अष्टविनायक गणपतीचे प्रथम स्थान असलेले मोठ्या संख्येने देशातून पर्यटक व भाविक येथे येतात. याच संधीचा फायदा घेऊन काही तरुण ज्योतिषी भाविकांची लूट करत असल्याचे प्रकार समोर आले. विविध प्रकारचे पूजा पाठ व नामजप करण्यासाठी भक्तांकडून पैसे उकळले जातात. देवदर्शनाला आलेले कुटुंब विशेषता: जोडपी व प्रेमी युगल यांना नाव आणि स्वभाव यावरून भविष्य सांगितले जाते.
बारामती शहराजवळ असलेल्या एका गावातून आलेले काही तरुण ज्योतिषी मोरगाव परिसरात फिरत असताना दिसतात. सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित लोकांप्रमाणे त्यांचे राहणीमान आहे. यामुळे सामान्य भाविक सहज त्यांच्यावर प्रभावित होतात. मोरगाव वाहन तळाच्या परिसरात सात ते आठ जण वेगवेगळ्या ठिकाणी वावरत असल्याचे सांगण्यात आले. अल्पावधीत श्रीमंत होण्याच्या आमिष दाखवून अनेकांना आर्थिक गंडा घातला जातो.
राज्यातील हे नामांकित व भक्तांच अखंड श्रद्धा असलेले स्थान आहे. या ठिकाणी येणाऱ्या भक्तांना अधिकाधिक उच्च दर्जाच्या सेवा सुविधा मिळणे ही काळाची गरज आहे. परंतु समाजातील काही कु प्रवृत्ती चे लोक व्यक्तिगत लाभ आणि स्वार्थापोटी भाविक भक्तांना फसवणूक करत आहेत.