अहिल्यानगर : मुस्लिम धर्माबाबत जाणीवपूर्वक अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. अशा स्थितीत आर्किटेक्ट अर्शद शेख लिखित ‘इस्लाम द अल्टिमेट आर्ट ऑफ लिव्हिंग’ या पुस्तकामुळे समाजातील मुस्लिमांबाबतचे गैरसमज दूर होण्यास मदत होईल. इस्लाम धर्मातील अनेक गोष्टींचे ज्ञान शेख यांनी अगदी साध्या, सोप्या भाषेत मांडले असून संशोधनाचा हा उत्कृष्ट नमुना आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋषीकेश कांबळे यांनी व्यक्त केले.
आर्किटेक्ट अर्शद शेख लखित ‘इस्लाम : द अल्टिमेट आर्ट ऑफ लिव्हिंग’ या पुस्तकाचे गुरुवारी (दि. ३) सायंकाळी सिटी लॉन येथे प्रकाशन झाले. याप्रसंगी डॉ. कांबळे बोलत होते. यावेळी माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, साहित्यिक डॉ. इक्बाल मिन्ने, राष्ट्र सेवादलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष वारे, अनंत लोखंडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. डॉ. मिन्ने म्हणाले, मुस्लिम धर्माबाबत राजकीय लोक जाणीवपूर्वक भ्रम पसरवत आहेत. त्यांना योग्य शब्दांत उत्तर देण्याचे काम हे पुस्तक करील. डॉ. निमसे म्हणाले, अर्शद शेख यांनी अनेक संदर्भ अभ्यासून हे पुस्तक लिहिले आहे. त्यामुळे हे पुस्तक सर्वांनी आवश्य वाचावे. या पुस्तकात लोकशाहीची मूल्ये पेरलेली असून सर्वांनी संविधानाला समोर ठेवून वर्तन करावे. तसेच जगातील महत्त्वाच्या भाषेत या पुस्तकाचे भाषांतर करावे, असे ते म्हणाले.
लेखक शेख यांनी पुस्तक लिखाणामागची भूमिका स्पष्ट केली. अर्शद शेख म्हणाले की, अज्ञान हे भीतीचे कारण असते. यातून असुरक्षितता आणि तात्पर्याने द्वेष निर्माण होतो. सध्या ज्या इस्लाम विषयी लोकांच्या मनात पूर्वग्रह आणि असुरक्षितता आहे तो मुळात इस्लाम नसून विरोधकांच्या अपप्रचारातून विकृतीकरण केलेला धर्म आहे. जेव्हा मुळ इस्लाम लोकांच्या समोर येईल तेव्हा निश्चितच त्याविषयी अज्ञान, असुरक्षितता आणि पूर्वग्रह दूर होतील आणि आपले सहजीवन सुकर होईल. अंर्तकलहाच्या स्थितीत कोणताही समाज प्रगती करू शकत नाही. अर्शद शेख म्हणाले की, या ग्रंथाच्या माध्यमातून समाजमन जोडले जाईल. सामाजिक सलोखा वृद्धिगत होऊन शांती स्थापित करण्याच्या उद्देशाने हा ग्रंथ लिहिला असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते. प्रा. डॉ. महेबूब सय्यद यांनी प्रास्ताविक केले. प्रा. बापू चंदनशिवे यांनी सूत्रसंचालन केले.

सदर ग्रंथ शहरातील प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध आहे. अथवा ७२७६५६२३३२ या नंबरवर कॉल करुन ग्रंथ मिळवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *