पापा कहते है,बडा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा..!

प्रत्येक पालक अन् कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी यावर नक्की विचार करावा

(सचिन बिद्री:धाराशिव)

बदलती जीवनशैली, कामाचा व्याप, तणाव व वाढती महागाई यामुळे पालक दिवसभर कामाच्या शोधात किंवा आहे ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यात (बहुतांश ठिकाणी) कुटुंबाचा कर्ता पुरुष हा घराबाहेर असतो त्यामुळे घरातील विद्यार्थ्यांचा अधीक संपर्क आई सोबत असतो.तसं पाहिलं तर विद्यार्थ्यांचा सर्वाधिक वेळ हा शाळेत/महाविद्यालयात शिक्षक/प्राध्यापक व मित्रासोबत जातो, उर्वरीत काही वेळ हा घरात आई सोबत.म्हणजेच आईची जबाबदारी अधीक.


उमरगा शहर व परिसरातील बऱ्याच ठिकाणी नव्याने एन ए प्लॉटिंग विक्रीसाठी सोयीस्कर अशी मोकळी जागा दिसून येते. या अश्या मोकळ्या जागेवर दिवसा दिवसा जाऊन पाहिलं तर ठिकठिकाणी दारूच्या बाटल्या, वेफर्सचे रिकामे पॉकेट आणि प्लास्टिक चे ग्लास दिसून येतात. अशीच काही परिस्थिती शाळा महाविद्यालयाच्या मैदानावर आणि बंद पडीक अवस्थेत असलेल्या शासकीय इमारतीमध्ये दृश्य दिसून येतात. रात्रीच्या वेळी नेमकं या अश्या ठिकाणी कोण बरं नशेडी वृत्तीचे येत असतील आणि ज्ञान गंगेच्या पवित्र मंदिरासमोर नशा करून मागे आपली घाण टाकून लोकांना पहा आमची कीर्ती असा संदेश देत असतील?


डिग्गी रोड लागत असलेल्या काही प्लॉटिंग च्या मोकळ्या मैदानात दुपारच्या 2 वाजण्याच्या सुमारास जे डोळ्यांना दिसलं ते तर हद्दचं झाली राव. अगदी दोंडाला मिशी फुटलेली नाही वय अंदाजे 14-15-16वर्षे वयोगटातील असतील असे 5 विद्यार्थी आपल्या स्कुल बॅगा बाळागून प्लॉटिंग मधल्या एका झाडाच्या सावलीखाली मद्यप्राशन करताना आढळून आले. त्या सर्वांचा राहणीमान, त्यांची दुचाकी वाहने आणि अंगावरील कपडे पाहून असे लक्षात आले की सर्व विद्यार्थी चांगल्या कुटुंबातील आहेत,सधन परिवारातील आहेत.खरंच ही पोलिसांची चूक आहे का हो.? या शालेय विद्यार्थ्यांना 18 वर्ष वय होण्यापूर्वी दुचाकी वाहने कोण पुरवतो.? त्यामुळे त्यांचा सायकल मुळे होणारा शारीरिक व्यायाम थांबला. कोण यांना महागाडे फोन पुरवतो ज्यामुळे नकळत सोशल मीडियाचा दुरुपयोग होतो पुस्तकं वाचणे किंवा अभ्यासात मन रमत नाही. कोन यांना पैसे पुरवतो ज्यामुळे दारू, सिगारेट आणि इतर हानिकारक गोष्टीकडे आकर्षित होऊ लागले.?


एका कार्यक्रमानिमित्ताने उमरगा शहारातील एका शाळेत गेलो होतो सकाळचे 11 वाजलेले. मी शाळेत फिरत भिंतीवरील सुविचार वाचत असताना एका खिडकीतून धूर निघत असलेला पहिला, माझी जिज्ञासा वाढली नेमकं हा कशाचा धूर असावा..? जवळ जाऊन पाहिलं तर टॉयलेट बाथरूम मधून तो धूर निघत होता, मी आत गेलो तिथे तीन आठवीचे विद्यार्थी सिगारेट असलेले निदर्शनास आले. मला पाहून ते सर्व घाबरले होते. त्यांनी सिगारेल पायात विझवली आणि मला विनवानी करु लागले की सरांना किंवा पालकांना सांगू नका.. ते बोलत होते मीं ऐकत होतो.. त्यांचे चेहरे, डोळे आणि बोलण्याची पद्धत ही विद्यार्थ्याला शोभेल अशी न्हवतीच. पण त्यांचे बालपण पाहून मीं त्याना माझ्या पद्धतीने खडसावून बरंच काही बोललो आणि तेथून निघालो पण मनात माझ्या विचारांचा वादळ तांडव करत होता. नेमकं समाजात काय चाल्लय? शाळा म्हणजे ज्ञानाचा मंदिर, सुंदर अक्षर हाच विद्यार्थ्यांचा खरा दागिना.. आणि आता या कलीयुगात विद्यार्थी खूप बदलत आहेत.याला खरंच पोलिस प्रशासन जबाबदार आहे का??घरातील प्रत्येक सदस्यांकडे स्वातंत्र मोबाईल असणे हे आता आवश्यक आहे असं समजू पण त्या सर्वांमध्ये किमान दिवसातून एकदा तरी सर्वांनी एकत्र येत दिवसभरातील घडामोडी, चढउतार, कामाचा स्वरूप किंवा चांगल्या वाईट अनुभव शेअर करून चर्चा घडून येनं आवश्यक आहे त्यामुळे तणावं दूर होतो. अन्यथा एखाद्या व्यक्तीच्या मनात नैराश्य असेल तर त्या नैराश्यातून विविध अनपेक्षित घटना जन्माला येऊ शकतात.


एकदा एका शिक्षक मित्राचा मला फोन आला आणि मला त्याने त्याच्या मित्राच्या घरी तातडीने बोलावले, कारण विचारना केली असता तो म्हणाला की ऑनलाईन रमी चा प्रकरण आहे तुम्ही प्लिज अर्जंट या.. तेंव्हा मीं लागलीच त्यांच्या घरी पोहोचलो. उमरगा शहरातील एका शाळेतील नववी वर्गात शिकणारा एका उच्चशिक्षित शिक्षकाचा मुलगा हा रडत होता, त्याला आई वडिलांनी बदडून काढलं होतं, कारणही तितकाच भयानक होता. ऑनलाईन अभ्यास करण्यास मुलाला चांगला महागडा मोठा पालकांनी दिला, त्या विद्यार्थ्याने त्यावर ऑनलाईन रमी चा ऍप डाऊनलोड करून रमी या खेळात तब्बल दीड लाख रुपये गमावले होते. मोबाईल आणि ऍप पर्यंत ठीक आहे पण पैसे कुठून आले असा मी विचारना केली तेंव्हा समजले की त्याने वडिलांच्या एटीएम कार्ड आधारे मनी ट्रान्सफर करून रमी खेळले, पैसे ट्रान्सफर झाल्याचा मॅसेज तरी वडिलांना आला असेल ना? यावर समजलं की जेंव्हा वडिलांचा मोबाईल घरी होता वडील व्यस्त असताना काही मिनिटासाठी मोबाईल मुलाकडे होता कदाचित तेंव्हाच हा मॅसेज आला आणि डिलीट केला असावा असं बेजबाबदार उत्तरे भेटली. मग आता नेमकं मुलाला मारू लागलात..? माझ्या या प्रश्नावर जे उत्तर भेटलं त्यावर मला शॉक बसला. ते म्हणाले मुलगा आणखी एक लाख मागू लागलाय.! मीं मुलाला विश्वासात घेत विचारलं बाळा मीं तुझा मित्र आहे, अडचण सांग मला मीं मदत करतो मग तो म्हणाला “मला पैसे पाहिजे पैसे, एक लाख रुपाये.. मीं म्हणाले कशाला हवे सांग मीं देतो, तो म्हणाला पत्ते खेळायला पत्ते.. मीं जेवढे हारलोय त्यापेक्षा अधीक काढू शकतो मला विश्वास आहे पण मला घरात आता पैसे देत नाहीत. असं त्याच म्हणणं समोर आलं. आई वडिलांना बाजूला घेऊन मीं आई वडिलांच्या चुका त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि मुलाला मारून काही लाभ होणार नाही त्याला जेवायला द्या आणि प्रेमाने विश्वासात घ्या.. हळू हळू मोबाईल काढून घ्या व पुन्हा कधीच मोबाईल देऊ नका, अभ्यासाची पुस्तके वाचण्याची आवड निर्माण करा वाटल्यास त्याच्या सोबत तुम्ही पण अभ्यासाला बसा त्याला समजून घ्या असं सल्ला दिला आणि दोन महिन्यानंतर आज रोजी तो मोबाईल शिवाय अभ्यास करु लागला आहे असं स्वतः पालक मला सांगितले मला मनस्वी आनंद झाला. वाचकांना मला विचारायचं आहे का खरंच याला पोलिस प्रशासन जबाबदार आहेत का..?


पाल्यांचा हट्ट, “सर्वकाही द्यायचं” हे आपलं धोरण आणि त्यातून घडणाऱ्या भयानक परिणामांकडे दुर्लक्ष – हे सर्व फक्त एक दिवस अशा अश्रूपूरित बातम्यांमध्ये बदलतं.

प्रश्न असा आहे – आपण आपल्या मुलांवर प्रेम करतो की अति-प्रेम?

प्रेम म्हणजे त्यांच्या प्रत्येक हाव-मर्जीवर “हो” म्हणणं नाही. प्रेम म्हणजे त्यांना योग्य ते निर्णय, संयम आणि शिस्त शिकवणं. बाईक चालवण्याचं वय, अनुभव,पैश्याची किंमत, माणुसकी, रस्त्यांची स्थिती, सुरक्षितता – हे सर्व आपण समजून घेतो का? की फक्त “इतरांकडे आहे, आपल्या मुलाकडे का नाही?” या स्पर्धेमुळे आपण लाखो रुपयांची जीवघेणी खेळणी त्यांच्या हातात देतो?

पालकांनी ‘हो’ म्हणण्याआधी ‘का’ विचारलं पाहिजे.

मुलाच्या एका हट्टासाठी 3 लाखांची बुलेट गाडी दिलीत,एक लाखाचा आय फोन देता उद्या जर तोच हट्ट तुम्हाला आयुष्यभराचं दुःख देऊन गेला, तर तुम्ही स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही.

आज थोडं ‘नाही’ म्हणाल, तर उद्या तुमचा मुलगा ‘हो’ म्हणून जगेल.

तुमच्या प्रेमाचा अर्थ फक्त वस्तूंमध्ये नाही, तर त्याच्या सुरक्षित भविष्यामध्ये असायला हवा. मुलं रडतील, रुसतील – पण सुसंस्कृत, स्वाभिमानी राहतील,आणि भविश्यात त्यांच्या हातून जे काही उत्तम कार्य घडतील त्यामुळे तुमचेच नाव रोशन होईल.

अजूनही उशीर झालेला नाही,आजपासूनच विचार बदला.आपल्या मुला मुलींना आपल्या परिस्थितीची जाणीव करून देत जा, पैश्याची किंमत सांगा, पैसे कमवने म्हणजे किती हालअपेष्टा सहन करावे लागतात याबाबत कल्पना देत जा.
नुसतं सिस्टीमला दोष देत बसू नका.. आपल्या घरात आपलं किती लक्ष आहे. आपण आपल्या पाल्याना किती वेळ देतोय त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी त्यांचे मित्र बना त्यांना चांगले वाईट अनुभव सांगत जा.
प्रेम करा, पण डोळसपणे.

आपली प्रतिक्रिया अवश्य नोंदवा..