गंगापूर (प्रतिनिधी) अमोल पारखे शहरातील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणारी घटना सोमवारी (५ मे) दुपारी घडली, जेंव्हा एका पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने शहरात थैमान घालत ११ नागरिकांना चावा घेत गंभीर जखमी केले. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

ही थरारक घटना दुपारी चारच्या सुमारास सुरू झाली. सर्वप्रथम कुत्र्याने एका तीन वर्षीय बालकावर हल्ला चढवला. त्यानंतर राजीव गांधी चौक व पोलिस स्टेशन परिसरात कुत्रा शिरला आणि तेथे उपस्थित असलेल्या एका मिस्त्रीसह अन्य नागरिकांवर आक्रमण केले. विशेषतः शिवराज सुभाष गायकवाड (२५) या तरुणाला गंभीर दुखापत झाली. काही वेळातच कुत्र्याने विविध भागात फिरून सातत्याने लोकांवर हल्ले सुरू ठेवले. जखमी नागरिकांमध्ये सोहेल सिराज शेख (२७, रा. काजीपुरा), अनिकेत नवनाथ काळे (१२), सुबेरा अफसर शेख (५), अशोक कारभारी चव्हाण (६०), शिवराज सुभाष गायकवाड (२५) यांचा समावेश आहे. काही जखमींना चेहऱ्यावर आणि डोळ्याजवळ चावा बसल्याने गंभीर जखमा झाल्या असून, एकाचा डोळा थोडक्यात बचावला आहे.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही जागरूक नागरिकांनी प्रसंगावधान राखत पिसाळलेल्या कुत्र्याला अखेर ठार केले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

सर्व जखमींवर गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ. विशाल सूर्यवंशी यांच्या देखरेखीखाली प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

स्थानिक प्रशासनाकडून अद्याप यावर ठोस कारवाई झालेली नसून, नागरिकांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नगर परिषद व पशुवैद्यकीय विभागाने तात्काळ पावले उचलने गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *