
गदाना, ता. खुलताबाद (८ जुलै २०२५)
ग्रामीण भागातील मुलींनीही आता यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. गदाना येथील कु. ऋतुजा सुनील चव्हाण आणि भडजी येथील कु. तनुजा भागीनाथ वाकळे यांनी अत्यंत प्रतिष्ठित समजली जाणारी चार्टर्ड अकाउंटंट (C.A.) परीक्षा उत्तीर्ण करून आपल्या गावासह जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल गदाना ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा नुकताच शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.
गदाना येथील ग्रामपंचायत कार्यालयात हा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सरपंच सौ. सविता पोपट चव्हाण यांच्या हस्ते दोन्ही गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला. या यशामागे खंबीरपणे उभे राहिलेल्या त्यांच्या पालकांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. कु. ऋतुजा चव्हाण हिचे वडील श्री. सुनील चव्हाण आणि कु. तनुजा वाकळे हिचे वडील श्री. भागीनाथ वाकळे यांचा यथोचित गौरव करण्यात आला. चेअरमन सुदाम मनोहर चव्हाण यांनी या सत्काराचे मनःपूर्वक स्वागत केले.
या सोहळ्यास माजी उपसभापती प्रकाश चव्हाण, माजी सभापती सुरेश चव्हाण, उपसरपंच कैलास बडुगे, ग्रामपंचायत सदस्य राजू चव्हाण, जनार्दन वाहुळ, काकासाहेब अधाने, रामहरी तुपे, वैजीनाथ अधाने, दत्तू चव्हाण, सुनिल चव्हाण, सोमिनाथ जाधव, बंडू अधाने, शंकर अधाने, लक्ष्मण अधाने, साहेबराव बडुगे, हिरालाल बडुगे, लवदास अधाने, प्रशांत गदाणकर, मदन ठेंगडे, लक्ष्मण चव्हाण, सुनिल जाधव, अशोक अधाने यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. समारोपावेळी उपस्थितांनी दोन्ही विद्यार्थिनी आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन करत त्यांना उज्वल भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
एनटीव्ही न्यूज मराठी – खुलताबाद