वार्ताहर : अशोक अधाने

गदाना (ता. खुलताबाद) – दिनांक 10 जुलै 2025 रोजी न्यू हायस्कूल गदाना येथे भारतातील सर्वात प्रतिष्ठेची समजली जाणारी चार्टर्ड अकाउंटंट (C.A.) परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला.

गदाना येथील कु. ऋतुजा सुनील चव्हाण व भडजी येथील कु. तनुजा भागीनाथ वाकळे या दोन विद्यार्थिनींनी C.A. सारखी अवघड परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून आपल्या गाव, शाळा आणि कुटुंबाचे नाव उज्वल केले. या त्यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी न्यू हायस्कूल गदाना प्रशालेत हा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमास शालेय समितीच्या अध्यक्षा श्रीमती पूर्णाताई अधाने, समिती सदस्य प्रकाश अधाने, सूर्यभान अधाने, राजू अधाने, मधुकर ठेंगडे, बंडू शेकू अधाने हे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देशमुख सर यांनी तर प्रास्ताविक श्रीमती पाटील यांनी केले. प्रेरणादायी मनोगत एस. देवरे यांनी व्यक्त केले आणि आभार प्रदर्शन एम.धनवे यांनी केले.

यावेळी दोनही माजी विद्यार्थिनींनी आपल्या अनुभवाविषयी मनोगत व्यक्त करताना शिक्षकांचा विशेष उल्लेख करून शाळेच्या योगदानाचे मन:पूर्वक आभार मानले. यावेळी दोघींचे कुटुंबीयही उपस्थित होते.

मुख्याध्यापक तथा प्राचार्य रंजीत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यांसह माजी विद्यार्थी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या गौरवप्रसंगी पत्रकार अशोक अधाने यांचीही उपस्थिती लाभली होती.

न्यू हायस्कूल गदाना या शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या घडवणुकीचे हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.