सांगली:
सांगलीतील आष्टा येथे आज अप्पर तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला.
इस्लामपूरचे प्रांताधिकारी, आष्टा अप्पर तहसीलदार राजेशेखर लिंबारे, नायब तहसीलदार रजपूत, आष्टा तलाठी स्वप्निल पाटील आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांनी आष्टा येथील श्रीराम हॉलमध्ये या शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात अनेक नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. याशिवाय, १ ते ८ ऑगस्ट दरम्यान ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात येणार असून, त्याअंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
(प्रतिनिधी: राहुल वाडकर, एनटीव्ही न्यूज मराठी, सांगली)