धाराशिव: उमरगा तालुक्यातील कदेर गाव आणि कदेर येथील सेवानगर तांडा येथे खुलेआम सुरू असलेले अवैध दारू विक्री व्यवसाय आणि जुगार अड्डे तात्काळ बंद करण्यात यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या लेटरहेडवर ग्रामस्थांनी २ ऑगस्ट रोजी पोलीस प्रशासनाला दिले आहे.

या निवेदनावर सेवानगर तांड्यातील ४९ महिलांसह पुरुष ग्रामस्थांच्या आणि कदेर गावातील जवळपास ७० ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महादेव साखरे यांच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, सेवानगर तांड्यात राजरोसपणे चालणाऱ्या दारू विक्री आणि जुगार अड्ड्यांमुळे दररोज भांडणे होतात. याचा विद्यार्थ्यांवर आणि युवकांवर विपरीत परिणाम होत असून, सामाजिक सलोखा धोक्यात येत आहे.
या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी तात्काळ दारू अड्डे उद्ध्वस्त करून जुगार अड्डे बंद करण्याची विनंती ग्रामस्थांनी केली आहे. जर प्रशासनाने यावर कारवाई केली नाही, तर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सेवानगर तांडा येथील सामाजिक कार्यकर्ते रोहित राजेंद्र चव्हाण, आकाश दिलीप राठोड, शरद सुभाष आडे, सुमित युवराज जाधव आणि सचिन नीळकंठ चव्हाण यांनी तंटामुक्त अध्यक्ष महादेव साखरे यांच्यासह उमरगा पोलीस ठाणे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी सर्व परिस्थिती अधिकाऱ्यांसमोर मांडली.
(प्रतिनिधी सचिन बिद्री, एनटीव्ही न्यूज मराठी – धाराशिव)