कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील वाठार येथील एका लॉजमध्ये संतोष अरुण देशमुख (वय ४७, रा. कोथरूड, पुणे) यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद पेठ वडगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता संतोष देशमुख आणि त्यांचे सहकारी मदन प्रभाकर गानगोटे (वय ५५, रा. माळवाडी, पुणे) हे दोघे वाठार येथील लॉजमध्ये राहण्यासाठी आले होते. त्यांनी चार दिवस राहणार असल्याचे सांगून आधारकार्ड दिले होते. लॉज व्यवस्थापनाला त्यांनी सांगितले होते की, संतोष देशमुख आजारी असून, दोघेही कामाच्या शोधात आहेत.
दरम्यान, मदन गानगोटे रोज सकाळी बाहेर जात आणि सायंकाळी परतत असत, तर संतोष देशमुख खोलीतच राहत होते. चार दिवसांनंतर, जेव्हा साफसफाईसाठी खोली उघडण्यात आली, तेव्हा आतून दुर्गंधी येत असल्याने संशय निर्माण झाला. आज सकाळी नऊच्या सुमारास गानगोटे यांनी पेठ वडगाव पोलिसांना संतोष देशमुख यांच्या मृत्यूची माहिती दिली.
संतोष देशमुख यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्यामागे आई-वडील, पत्नी, मुलगी तसेच भाऊ-बहीण असा परिवार आहे. या प्रकरणातील गुंतागुंत पाहता, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
(एनटीव्ही न्यूज मराठी, कोल्हापूर)