अकोला जिल्ह्यातून दोन आरोपींना अटक, ५ मोबाईल आणि रोकड हस्तगत करण्यात यश.
वाशिम: वाशिम जिल्ह्यात अवैध धंदे आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड आणि सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम पोलीस सातत्याने काम करत आहेत. चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावून गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस नेहमीच सतर्क असतात.
काल, दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ६ ते ८ च्या दरम्यान वाशिम शहर आणि ग्रामीण भागात जबरी चोरीच्या ४ घटना घडल्या. घटनेची माहिती मिळताच वाशिम शहर, वाशिम ग्रामीण, स्थानिक गुन्हे शाखा आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली. फिर्यादींनी दिलेल्या माहितीनुसार, यामाहा आर १५ रेसर बाईकवरून आलेल्या तीन आरोपींनी चाकूचा धाक दाखवून पैसे आणि मोबाईल जबरदस्तीने चोरले होते.
सर्व फिर्यादींनी आरोपींचे वर्णन सारखेच सांगितल्याने पोलिसांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली. तात्काळ पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांनी वेगवेगळ्या टीम तयार करून आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि योगेश धोत्रे, वाशिम ग्रामीणच्या सपोनि श्रीदेवी पाटील आणि वाशिम शहरचे सपोनि बाळासाहेब नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना झाली.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आरोपी अकोला जिल्ह्यातील असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे बार्शिटाकळी तालुक्यातील सुकळी पैशाळी गावात पोलिसांनी धाव घेतली. तिथे पोनि धुमाळ यांच्या पथकाच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू असताना, माहितीनुसार एक बाईक एका घरात उभी दिसली. पोलिसांनी घराला वेढा घालून घरात प्रवेश केला. या कारवाईदरम्यान एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला, तर दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राजु तुळशराम कांबळे (रा. पंचशील नगर, वाशिम) आणि प्रसिक युवराज जाधव (रा. सुकळी पैशाळी, ता. बार्शिटाकळी, जि. अकोला) अशी आहेत. चौकशीदरम्यान त्यांनी सर्व गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेले ५ मोबाईल आणि रोख रक्कम जप्त केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि संतोष शेटे करत आहेत.
या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.
प्रतिनिधी फुलचंद भगत,
एनटीव्ही न्यूज मराठी – मंगरुळपीर, वाशिम.