- मानोरा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक पार.

वाशिम:
वाशिम जिल्ह्यातील मानोरा पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ठाणेदार नैना पोहेकर यांनी आगामी सण आणि उत्सव डिजेमुक्त आणि गुलालविरहित करून त्याऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन केले. यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
ठाणेदार पोहेकर यांनी सांगितले की, सण-उत्सव हे भारतीय समाजाला एकत्र जोडणारे माध्यम आहेत आणि यातूनच सर्वधर्म समभाव टिकून राहतो. ही सामाजिक समरसता टिकवण्याची जबाबदारी प्रत्येक समाजाची आहे. पोलीस फक्त सहकार्य करण्यासाठी आहेत. त्यामुळे गणेशोत्सव व इतर सण-उत्सव डिजेला प्राधान्य न देता पारंपरिक वाद्यांसह साजरे करावेत. २५ ऑगस्ट रोजी मानोरा पोलीस स्टेशनच्या प्रांगणात आयोजित या बैठकीत त्या गणेशोत्सव मंडळांच्या सदस्यांना मार्गदर्शन करत होत्या.
या बैठकीत नायब तहसीलदार उमेश बनसोड, पी.एस.आय. विजय अजमिरे, भारत रामटेके, महावितरणचे खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. ठाणेदार पोहेकर यांनी पुढे मार्गदर्शन करताना सांगितले की, गणेशोत्सव साजरा करताना शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेचा आदर्श घ्यावा आणि गुलालावर पूर्ण बंदी घालावी. कोणीही कायदा हातात घेतल्यास संबंधित गणेश मंडळावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी रविंद्र पवार, असलम पोपटे, राम राऊत, गोपाल लाहोटी, पीएसआय अजमिरे आदींनीही मार्गदर्शन केले. पोलीस पाटील वासुदेव सोनाने यांनी बैठकीचे संचालन केले, तर आभार पीएसआय विजय अजमिरे यांनी मानले. या शांतता समितीच्या बैठकीला शहर आणि गावागावांमधील गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकार उपस्थित होते.
प्रतिनिधी फुलचंद भगत,
एनटीव्ही न्यूज मराठी, मंगरुळपीर, वाशिम