♦️राहुरीतून १३ ट्रक सुगंधी सुपारी हस्तगत ;स्थानिक गुन्हे शाखेने पकडला साडेआठ कोटीचा मुद्देमाल


नगर : कर्नाटकहून गुजरातकडे सुपारी व तंबाखू वाहतूक करणारे १३ ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहुरी परिसरात ताब्यात घेतले आहे. अवैध गुटखा बनविण्यासाठी लागणारी सडलेली लाल रंगाची सुपारी, व तंबाखू असा तब्बल ८ कोटी ४३ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत संबंधितांना नोटीस देण्यात आल्या असल्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अबरार अल्लाउद्दीन खान (वय ३०, रा. साखरस, ता. फिरोजपूर, जि. नुह, हरियाणा), तोफीक इसब खान (वय २८, रा. बिरसिका, ता. नुह, हरियाणा), अक्रम इसब खान (वय २८, रा. बिलंग, ता. कामा, जि . भरतपूर, राजस्थान), इर्शाद ताजमोहम्मद मेहू (वय ३०, रा. उंबरी, फिरोजपूर जि. नुह, हरियाणा), अशोक पोपट पार वय ४७, रा. मिरजगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर), रखमाजी लक्ष्मण मगर (वय ३४, पाटेगाव, ता. कर्जत, जि.अहिल्यानगर), कालिदास बाबुराव काकडे (वय, ६३, रा. सावडी, ता. करमाळा, जि. सोलापूर), आसिफ पप्पू मेव वय २६, रा. आकेडा , ता. नुह , हरियाणा), जमशेर अब्दुल रज्जाक खान (वय,४५, रा. करवडी, ता. पुनहाना, जि. मेवाद, हरियाणा), सचिन जिजाबा माने वय ३९, रा. केडगाव, जि . अहिल्यानगर), असे ट्रक चालकांची नावे आहेत. 

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले की,

गेल्या दोन तीन महिन्यात अहिल्यानगर, शेवगाव, राहुरी, पाथर्डीसह जिल्ह्यात मावा बनविणारे कारखाने पोलीस प्रशासनाने उद्ध्वस्त केले आहेत. त्यात आज जिल्ह्यात १३ ट्र्क  सुपारी व तंबाखू वाहतूक करणारी ट्रक ताब्यात घेतले आहे. याबाबत चौकशी केली जात आहे. संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार राहुरी तालुक्यातील एका हॉटेल समोर ट्रक उभे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने चौकशी केली असता सडलेली लाल रंगाची सुपारी, व तंबाखू ही कर चुकवून व बनावट बिले तयार करून आणली असल्याचे प्रथमदर्शी दिसून आले. यामध्ये ६ कोटी १७ लाख ८५ हजार रुपयांची २ लाख ५ हजार ९५० किलो सुपारी,  व १५ लाख ६० हजारांची ७ हजार ८०० किलो तंबाखू व २ कोटी, १० लाख रुपये किमतीचे १३ वाहने असा एकूण ८ कोटी ४३ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.  ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, गणेश लबडे, राहुल द्वारके, लक्ष्मण खोकले, भीमराज खर्से, रिर्चड गायकवाड, राहुल डोके, सतीश भवर, सुनील मालनकर, महादेव भांड, उमाकांत गावडे यांच्या पथकाने केली.